एअर इंडियाच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कारवाई करा; नेमबाज मनू भाकरची मागणी

टीम ई सकाळ
Saturday, 20 February 2021

दिल्लीवरुन सरावासाठी भोपाळला निघालेली असताना तिला या प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. 

विमानतळावर आपल्याला अपमानित करणाऱ्या एअर इंडियाच्या त्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हीने केली आहे. दिल्लीवरुन सरावासाठी भोपाळला निघालेली असताना तिला या प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि युथ ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या 19 वर्षीय पिस्तूल नेमबाज मनू भाकर हीला शुक्रवारी दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी रोखलं होतं. दरम्यान, क्रिडा मंत्री किरेन जिजूजू यांच्या मध्यस्थीनंतर तिला प्रवासाला परवानगी मिळाली होती. आपल्याला मदत केल्याबद्दल मनूने क्रिडा मंत्र्यांचे आभार मानले आहेत. तसेच अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक देणाऱ्या दिल्ली विमानतळावरील त्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली आहे. 

कर्मचाऱ्यांनी मोबाईल हिसकावून घेतला

मनू भाकर हीने पीटीआयशी बोलताना म्हटलं की, "माझ्या छळवणुकीला आणि अपमानाला कारणीभूत असणाऱ्या मनोज गुप्ता आणि एअर इंडियाच्या दुसऱ्या एका सुरक्षारक्षकाला वाचवण्याचा प्रयत्न जर कंपनीने केला तर त्याचा कंपनीच्या प्रतिष्ठेचा फटका बसेल. एअर इंडिया आता अस दावा करतंय की, त्यांचे कर्मचारी केवळ कागदपत्रं मागत होते आणि ते केवळ त्यांचं काम करत होते. मात्र, मला खात्री आहे की सर्वकाही कॅमेरॅत कैद झालं असेल. 
माझ्या छळवणुकीचा प्रकार घडत असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यातील माझ्या आईने या कर्मचाऱ्यांचे काढलेले फोटो डिलीट केले"

नेमका काय घडला होता प्रकार?

नेमबाजीच्या सरावासाठी पिस्तूल घेऊन दिल्लीहून भोपाळला जाणाऱ्या मनू भाकरला एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी शस्त्र नेण्यास परवानगी नाकारली होती. तसेच परवानगी देण्यासाठी तिच्याकडे पैसेही मागण्यात आले. मनूकडे पिस्तूल नेण्याची परवानगी असणारं पत्र होतं. पण त्यानंतरही विमानतळावरील आधिकाऱ्यांनी तिच्याकडे 5 हजार 200 देण्यास सांगितले; पण काही वेळात हीच रक्कम दोन पिस्तूल असल्याने 10 हजार 400 करण्यात आली. ही अतिरिक्त रक्कम का? अशी विचारणा केली होती. तसेच त्यानंतर या सर्व प्रसंगाची माहिती देणारं ट्विट केलं होतं. तिचं हे ट्विट क्षणात व्हायरलं झाल्यानंतर त्याची थेट क्रिडा मंत्र्यांनी दखल घेतली तसेच एअर इंडियाने देखील माफी मागितली होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manu Bhaker demands action against Air India employees for harassment