मनूची अंतिम फेरी थोडक्‍यात हुकली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

सरत्या वर्षातील चारही विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवलेल्या भारतास विश्‍वकरंडक नेमबाजी अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत पहिल्या दोन दिवसांत एकही पदक जिंकता आलेले नाही. मनू भाकरची 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारात थोडक्‍यात हुकलेली अंतिम फेरी हाच दुसऱ्या दिवशी दिलासा ठरला.

मुंबई : सरत्या वर्षातील चारही विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवलेल्या भारतास विश्‍वकरंडक नेमबाजी अंतिम टप्प्याच्या स्पर्धेत पहिल्या दोन दिवसांत एकही पदक जिंकता आलेले नाही. मनू भाकरची 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारात थोडक्‍यात हुकलेली अंतिम फेरी हाच दुसऱ्या दिवशी दिलासा ठरला.

चीनमधील या स्पर्धेत मनूप्रमाणेच राही सरनोबतकडून पदकाची आशा होती, पण मनू दहावी आली; तर राही पात्र 18 स्पर्धकांत अखेरची आली. पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अनिष भानवाल पदक ठरवणाऱ्या अंतिम फेरीपासून दूरच राहिला. तो 15 स्पर्धकांत दहावा आला.

मनूने प्रिसिशनमध्ये 292 गुण घेत आघाडीच्या स्पर्धकात स्थान मिळवले होते, पण रॅपिडमध्ये तिला 291 गुणच मिळवता आले. तिच्या स्पर्धकांनी 299 गुणांपर्यंत वेध घेतला. मनू तसेच अन्य दोघींचे समान गुण झाले, पण अचूक गुणांच्या वेधात मनू कमी पडली आणि तिला अंतिम फेरीपासून दूर राहावे लागले.

आशियाई क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक विजेत्या राहीचे अचूक लक्ष्य मनूपेक्षा (25-17) जास्त होते, पण तिचे अन्य गुण खूपच कमी होते. तिला प्रिसिशनमध्ये 283 आणि रॅपिडमध्ये 286 गुणच मिळवता आले. प्रिसिशनमधील दुसऱ्या; तर रॅपिडमधील पहिल्या फैरीत तिची कामगिरी खराब झाली.

अनिष भानवालने पहिल्या टप्प्यात 292 गुणांची कमाई केल्यावर दुसऱ्या टप्प्यात तो 287 गुणच घेऊ शकला आणि तो अंतिम फेरीपासून दुरावला. अंतिम फेरी गाठलेला सहावा नेमबाज आणि अनिष यांच्यात पाच गुणांचा फरक होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manu missed the final just by whisker