उत्तेजक द्रव्य दोषीतील चौघांचे निलंबन, संजीवनीवर चौकशीनंतर कारवाई: सुमारीवाला 

residentional photo
residentional photo

नाशिक ः उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळलेल्या धावपटू निर्मला शिरॉन, संदीप कुमारी, नवीन चिकारा आणि जुमा खातुम या चौघांचे थेट निलंबन करण्यात आले आहे. नाशिकची धावपटू संजीवनी जाधव हिने स्पर्धेपूर्वी घेतलेले उत्तेजक द्रव्य लपविण्यासाठी दुसऱ्या औषधांचा (मास्किंग ड्रग्ज) वापर केला. त्यामुळे तिने घेतलेल्या द्रव्याची उच्चतम तज्ज्ञांकडून चौकशी केली जाईल. या चौकशीत ती दोषी आढळल्यास तिचेही निलंबन होईल. तत्पूर्वी ती स्वतःहून चौकशी पूर्ण होईपर्यंत स्पर्धेपासून दूर राहू शकते. तो सर्वस्वी तिचा निर्णय आहे, असे ऍथलेटिक्‍स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी "सकाळ'ला सांगितले 

देशभर गाजत असलेल्या उत्तेजक द्रव्य सेवनातील धावपटूंबद्दल श्री. सुमारीवाला यांनी "सकाळ'शी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. ते म्हणाले, की उत्तेजक द्रव्य चाचणीत एकाच वेळी चार-पाच धावपटू पकडले जाणे ही भारतीयांसाठी अंत्यत लाजिरवाणी बाब आहे. स्पर्धेत आपली क्षमता, उत्साह आणि जास्त काळ तग धरण्यासाठी धावपटू वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. उत्तेजक द्रव्य सेवन हा त्यातील एक प्रकार आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतात इतर क्रीडा प्रकारांप्रमाणेच ऍथलेटिक्‍समध्येही या द्रव्य सेवनाने शिरकाव केला आहे.

अशियाई क्रीडा स्पर्धेसाठी गुवाहाटी येथे झालेल्या आंतरराज्य निवड चाचणीदरम्यान उत्तेजक द्रव्य सेवनाचा हा सारा प्रकार घडला आहे. या ठिकाणी घेण्यात आलेल्या चाचणीत निर्मला शिरॉन, संदीप कुमारी, नवीन चिकारा आणि जुमा खातुम यांच्यासह संजीवनी जाधव हिनेही द्रव्य सेवन केल्याचे आढळले. त्यानंतर ऍथलेटिक्‍स फेडरेशनने नियुक्त राष्ट्रीयस्तरावर उत्तेजक द्रव्य चाचणी तपासणी समिती (नाडा)च्या तज्ज्ञ समितीने त्याचा सविस्तर अहवाल फेडरेशनलाही सादर केला. त्यानुसार फेडरेशनच्या बैठकीत या गंभीर विषयावर चर्चा होऊन संजीवनी वगळता चौघांचे तातडीने निलंबन करण्याचे ठरले. 


संजीवनीच्या बेंगळुरूच्या चाचणीत "ते'च द्रव्य 
ते म्हणाले, की पाच आणि दहा हजार मीटरमध्ये प्रतिनिधीत्व करणारी नाशिकची संजीवनी जाधव हिची गुवाहाटी येथे उत्तेजक द्रव्य चाचणी झाली. त्यात तिने शारीरिक क्षमता आणि जास्त काळ टिकून राहण्यासाठी जे उत्तेजक द्रव्य घेतले ते लपून राहण्यासाठी काही पुरक (मास्किंग ड्रग्ज) औषधे घेतली. त्यामुळे ती या प्रकरणात दोषी आहेच. पण तिच्यावर थेट निलंबनाची कारवाई न करता चौकशी केली जाईल. नेमकी कोणती पुरक औषधे आणि किती प्रमाणात घेतली, याची सविस्तर चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले. धावपटूंनी घेतलेल्या औषधांचा उल्लेख करता येणार नाही, असेही ते म्हणाले. 

प्रशिक्षकांवर कारवाई 
धावपटूंनी नोंदविलेल्या यशात प्रशिक्षकांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळेच धावपटूंबरोबरच सत्कार सोहळा होतो. दोघांनाही वर्तमानपत्र, वाहिन्यांवरून भरपूर प्रसिद्धी, पैसा मिळतो. अनेक प्रशिक्षक खेळाडूंच्या नावावरच प्रशिक्षण केंद्र सुरू करून भरपूर पैसाही कमवतात. उत्तेजक द्रव्य सेवनात दोषी आढळलेले धावपटू हे प्रशिक्षक, आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शन, सल्ल्याशिवाय काहीच करत नाही. त्यामुळेच या धावपटूंशी संबंधित सर्व प्रशिक्षकांवर कारवाई करण्याचा फेडरेशन विचार करत आहे. 

संजीवनी देणार पत्रास उत्तर 
धावपटू संजीवनी जाधव ही दोषी आढळल्याचे "नाडा'चे पत्र तिला मिळाले असून, या पत्राला उत्तर देणार असल्याचे दिल्लीत असलेल्या जाधव कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. ऍथलेटिक्‍स फेडरेशन ऑफ इंडियाकडून तिची तूर्त चौकशी केली जाणार आहे. आगामी काळात वर्षभर कुठल्याच स्पर्धांचे नियोजन नाही. त्यामुळे संजीवनी चौकशी होईपर्यंत स्पर्धेपासून दूर राहिल्यास तिच्या फायद्याचे ठरेल, असे तज्ज्ञांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com