ग्रॅन्डमास्टर विदित, अभिजितवर हल्ल्याचा प्रयत्न 

श्रीकृष्ण कुलकर्णी
सोमवार, 10 डिसेंबर 2018

नाशिक ः मनिला (फिलिपीन्स) येथे सुरू असलेल्या एशियन कॉन्टिनेन्टल चेस चॅंपियनशिप स्पर्धेदरम्यान हॉटेलमध्ये पाणी व नेटची व्यवस्था नसल्याने बाहेर पडलेल्या ग्रॅन्डमास्टर विदित गुजराती, अभिजित कुंटे व ललित बाबू यांच्यावर चार ते पाच जणांच्या अज्ञातांनी हल्ला करत लुटण्याचा प्रयत्न केला. या जीवघेण्या हल्ल्यातून हे तिघेही थोडक्‍यात बचावले. या संदर्भात या तिघांनीही फिडे व एशियाई चेस फेडरेशन (एसीएफ)कडे तक्रार केली आहे. परदेशातील स्पर्धांसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

जागतिक स्तरावरील या स्पर्धेसाठी भारतातून ग्रॅन्डमास्टर अभिजित कुंटे, विदित गुजराती आणि ललित बाबू हे तिघे गेलेले आहेत. एशियाई चेस फेडरेशनने व्यवस्था केलेल्या हॉटेलमध्ये ते राहत होते. या हॉटेलमध्ये पाण्याची व्यवस्था व नेटही नसल्याने ते वैतागले. त्यांनी व्यवस्थापकाकडे याबाबत विचारणा केली मात्र हॉटेल व्यवस्थापकाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हे तिघेही पाणी आणण्यासाठी "नेट' वापर व संपर्क साधण्यासाठी हॉटेलबाहेर पडले. हॉटेलपासून काही अंतर चालून गेल्यानंतर मागून आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्‍याने पुढे असलेल्या विदितला पकडत त्याच्याकडील पॉकेटमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण विदितने हाताला हिसका देत आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत पळ काढला.

याचदरम्यान इतर दोघा-तिघांनी आपला मोर्चा अभिजित व ललित बाबूकडे वळविला. त्यांच्यावरही तीक्ष्ण हत्याराने वार करत जखमी करण्याचा आणि पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. पण हे दोघेही पळाले. त्यानंतर अज्ञातांनी हॉटेलपर्यंत या तिघांचा पाठलाग केला. तिघेही हॉटेलमध्ये सुखरूप परतल्यानंतर ते टोळके निघून गेले. या तिघांनी हॉटेल व्यवस्थापनाला सर्व घडलेली हकीगत सांगत सुरक्षेची मागणी केली. 

फिडे, एसीएफकडे नोंदविली तक्रार 
गेल्या काही वर्षांपासून परदेशात भारतीय खेळाडू, तसेच नोकरीनिमित्त गेलेल्यांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. या संदर्भात विदित, अभिजित व ललित बाबू यांनी या घटनेनंतर तातडीने फिडे व एसीएफच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदविली आहे. स्पर्धेसाठी निश्‍चित केलेल्या हॉटेलसाठी हजारो, लाखो रुपये मोजावे लागतात मात्र त्या प्रमाणात सुविधा मिळत नसल्याची तक्रार या तिघांनी करत शिवाय फिडे व एसीएफच्या नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त केली. विदितचे वडील डॉ. संतोष गुजराथी "सकाळ'शी बोलताना म्हणाले, की या तिघांवर अज्ञातांनी केलेला हल्ला हा भ्याडच होता. तिघेही थोडक्‍यात बचावले. हे तिघेही सुखरूप आहेत. काळजी करण्यासारखे काहीच नाही. मात्र अशा पद्धतीने जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या बुद्धिबळपटूंची काळजी फिडे व एसीएफसारख्या संस्थांनी घेणे गरजेचे आहे. परदेशात आमच्या मुलांवर असे हल्ले होत असताना आमचे लक्ष कसे लागेल? ते जर भारताचे प्रतिनिधित्व करत असतील तर क्रीडा खाते व संघटनांनी सुरक्षेची जबाबदारी उचलली पाहिजे, त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही, असे मला वाटते. 
 
Web Title: marathi news attack grandmaster vidhit,abhijit