भ्याड हल्ल्यातून स्वतःला सावरण्याचा तिघा ग्रॅन्डमास्टरचा प्रयत्न 

residentional photo
residentional photo

नाशिकः मनिला (फिलिपीन्स) येथे सुरू असलेल्या एशियन कॉन्टिनेंटल चेस चॅंपियनशिप स्पर्धेदरम्यान रविवारी (ता. 9) ग्रॅन्डमास्टर अभिजित कुंटे, विदित गुजराती व ललित बाबू यांच्यावर झालेल्या अज्ञातांच्या हल्ल्यातून हे तिघेही अजूनही सावरलेले नाहीत. निवासाची व्यवस्था असलेल्या प्रसिद्ध टियारा ओरिएंटल हॉटेलसह इतरांकडून भारतीयांची भाड्यापोटी लूटच केली जात आहे. त्या तुलनेत सुविधा मात्र काहीच दिल्या जात नाहीत. हॉटेलचे मानांकनही नावालाच असल्याचे या तिघांच्याही बोलण्यातून जाणवले. 
मनालीतील मकाती येथे जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेच्या साखळीत महत्त्वाची असलेली ही स्पर्धा "फिडे'तर्फे घेण्यात येत आहे. स्पर्धेपूर्वी निवासाची फिडे, तसेच आशियाई चेस फेडरेशनतर्फे व्यवस्था केली जाते. या तिघांनी भाड्याच्या लुटालुटीबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की मनिलातील कुठल्याही हॉटेलमध्ये 2500 ते 3600 रुपये (35 ते 50 डॉलर, आजच्या 71.33 पैसे भावाप्रमाणे) एवढे दिवसाला भाडे आकारले जाते. प्रत्यक्षात भारतीयांकडून मात्र हेच भाडे दहा ते साडेदहा हजार रुपये रोज (150 डॉलर आजच्या भावाप्रमाणे) एवढे घेतले जाते. आमच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर भाड्यापोटी ही रक्कम घेण्यात आली. स्पर्धा आम्ही राहत असलेल्या टियारा ओरिएंटल व रेडडोअरझ प्रीमियम या दोन हॉटेलमध्ये होत असल्याने खेळाडूंची निवासाची व्यवस्थाही तेथेच केलेली असते. मकाती हे शहरही नावाजलेले आहे, पण हॉटेलमध्ये पाणी व "नेट'सारखी सुविधा मिळू नये, ही लाजिरवाणी बाब असल्याचे विदित, अभिजितने चॅटिंग करताना सांगितले. रविवारचा प्रसंग व घटना आम्ही विसरूच शकत नाही. 


भारतीयांना हीन लेखण्याचा प्रयत्न 

या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रसंगानंतर आम्ही संयोजकांना सर्व माहिती दिली, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना या घटनेचे काहीच गांभीर्य वाटले नाही. या ठिकाणी अशी घटना घडू शकत नाही, असेच संयोजकांचे म्हणणे होते. आम्हाला या हॉटेलमध्ये जबरदस्ती ठेवून घेण्यात आले आहे. हॉटेलच्या रूममधील साफसफाई, नाश्‍ता, जेवण, पाणी हेही वेळेवर पुरविले जात नाही. एकप्रकारे खेळाडूंची पिळवणूक केली जाते. एवढेच नव्हे, तर भारतीयांना हीन वागणूक दिली जात असल्याचे ते सांगतात. या संदर्भात आम्ही तिघांनीही "फिडे'कडे तक्रार केली असून, वरिष्ठ अधिकारी आमच्या तक्रारीची दखल घेतील, अशी त्यांना अपेक्षा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com