esakal | विराटसेना 'विजयाचं सोनं' लुटणार! 
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli MS Dhoni

भारताने चेन्नई, कोलकाता, इंदूर वनडे जिंकून मालिका खिशात टाकल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवरील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी बाजी मारून भारताची लागोपाठ नऊ विजयांची मालिका खंडित केली होती.

विराटसेना 'विजयाचं सोनं' लुटणार! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : बंगळूरमध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड रोखून धरल्याने ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्‍वास उंचावला असला तरी, विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवरील पूर्व इतिहास भारताच्या बाजूने असल्यामुळे येत्या रविवारी होणाऱ्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात विराटसेनेने विजयरूपी सोनं लुटावे अशीच सर्वांची इच्छा असणार यात शंका नाही. 

भारताने चेन्नई, कोलकाता, इंदूर वनडे जिंकून मालिका खिशात टाकल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवरील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी बाजी मारून भारताची लागोपाठ नऊ विजयांची मालिका खंडित केली होती.

भारत दौऱ्यात उशिरा का होईना विजयाचा सूर गवसल्याने ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्‍वास परतला आहे. त्यामुळे नागपुरातील पाचव्याही सामन्यात विजय मिळवून टी-20 मालिकेत नव्या दमाने उतरण्याचा पाहुण्या संघाचा निश्‍चितच प्रयत्न राहील.

बंगळूरमध्ये सर्वच गोष्टी ऑस्ट्रेलियाच्या मनासारख्या घडल्या. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजांनी मालिकेत प्रथमच तीनशेच्या वर (5 बाद 334) धावा काढल्या. त्यानंतर गोलंदाजांनी बलाढ्य भारताला 313 धावांत रोखून धरले. विजयासाठी आवश्‍यक असलेल्या 'कम्प्लिट पॅकेज'मुळेच ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकता आला. 

येथील सामन्याचा इतिहास बघितला, तर नागपुरात भारताला पराभूत करणे ऑस्ट्रेलियाला सोपे जाणार नाही. या मैदानावर उभय संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतानेच बाजी मारली आहे. स्टेडियम बांधण्यात आल्यानंतर झालेल्या (ऑक्‍टोबर 2009) पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी धुव्वा उडविला होता. त्यानंतर ऑक्‍टोबर 2013 मध्ये झालेल्या सामन्यातही भारताने ऑस्ट्रेलियाला सहा गडी राखून सहज पराभूत केले होते.

कर्णधार विराट कोहलीसाठी निश्‍चितच ही समाधानाची बाब राहील. मात्र, सामने इतिहासातील कामगिरीवर जिंकले जात नाही, याचीही विराटला जाणीव आहे. त्यामुळे विनाकारण प्रयोग न करता पुन्हा 'विनिंग कॉम्बिनेशन'सह मैदानात उतरल्यास भारतीय संघ नक्‍कीच मालिकेचा शेवट गोड करू शकतो. नागपूरची खेळपट्‌टीही चिन्नास्वामीप्रमाणेच फलंदाजांना पोषक मानली जात असल्यामुळे, या सामन्यातही क्रिकेटप्रेमींना धावांचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्‍यता आहे. 

जामठा स्टेडियमवरील 'वनडे' इतिहास 
तारीख प्रतिस्पर्धी संघ विजयी संघ फरक 

 • 28-10-2009 भारत-ऑस्ट्रेलिया भारत 99 धावा 
 • 18-12-2009 भारत-श्रीलंका श्रीलंका 3 गडी 
 • 22-2-2011 इंग्लंड-हॉलंड इंग्लंड 6 गडी 
 • 25-2-2011 ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया 7 गडी 
 • 28-2-2011 कॅनडा-झिंबाब्वे झिंबाब्वे 175 धावा 
 • 12-3-2011 भारत-द. आफ्रिका द. आफ्रिका 3 गडी 
 • 30-10-2013 भारत-ऑस्ट्रेलिया भारत 6 गडी 
 • जामठा स्टेडियमवर 2009 पासून आतापर्यंत विविध संघांचे एकूण सात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने झाले. यजमान भारताने चारपैकी दोन सामने जिंकले. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव. 
 • ऑस्ट्रेलियाविरुद्ध मात्र शंभर टक्‍के कामगिरी. दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडिया कांगारूंवर भारी. 
 • सर्वोच्च धावसंख्या : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत 50 षटकांत 7 बाद 354 धावा (28 ऑक्‍टोबर 2009) 
 • सर्वोच्च वैयक्‍तिक धावसंख्या : भारताविरुद्ध जॉर्ज बेली (ऑस्ट्रेलिया) 156 धावा (30 ऑक्‍टोबर 2013) 
 • सर्वाधिक एकूण धावा : महेंद्रसिंह धोनी (भारत) 4 सामन्यांमध्ये 134 च्या सरासरीने 268 धावा (दोन शतके, सर्वोच्च 124 धावा) 
 • उत्कृष्ट गोलंदाजी : भारताविरुद्ध डेल स्टेन (द. आफ्रिका) 50 धावांत 5 बळी (12 मार्च 2011) 
 • सर्वाधिक बळी : मिशेल जॉन्सन (ऑस्ट्रेलिया) 3 सामन्यांमध्ये एकूण 9 बळी (सर्वोत्तम : 33 धावांत 4 बळी) 
 • सर्वोत्तम भागीदारी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या रोहित शर्मा व शिखर धवन यांच्यात पहिल्या गड्यासाठी 178 धावांची भागीदारी (30 ऑक्‍टोबर 2013)
loading image
go to top