८०वी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा : आनंदचा दुसरा विजय   

केदार लेले
मंगळवार, 16 जानेवारी 2018

भारताच्या विश्वनाथन आनंदने ८०वी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेतील दमदार फॉर्म कायम ठेवत सोमवारी दुसऱ्या विजयाची नोंद केली. 

हॉलंड : भारताच्या विश्वनाथन आनंदने ८०वी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेतील दमदार फॉर्म कायम ठेवत सोमवारी दुसऱ्या विजयाची नोंद केली. 

आनंद आणि अनिष गिरी यांची संयुक्त आघाडी! 
शनिवारी पहिल्या फेरीत आनंदने मॅटलॅकॉवला हरवून दणक्यात सुरवात केली. काळ्या मोहऱ्यांनी खेळताना दुसऱ्या फेरीत आनंदने कॅराकिनला बरोबरीत रोखले! तिसऱ्या फेरीत पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना आनंदने कारुआना वर दमदार आणि आक्रमक विजय नोंदवला! या विजयामुळे अडीच गुणांसह आनंद आणि अनिष गिरी संयुक्तरीत्या आघाडीवर आहेत!

अधिबनचा सलग दुसरा पराभव
काल अधिबनला मॅग्नस कार्लसन विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता! तर आज गॅविन जोन्स ने अधिबनला पराभूत केले! अधिबन चा हा सलग दुसरा पराभव आहे! 'अ' गटा मध्ये हे दोन डाव वगळता बाकीचे सर्व डाव बरोबरीत सुटले!

'ब' गटात विदीथ गुजराथी विजयी; हरिका द्रोणावल्ली चा विजय हुकला! 
'ब' गटा मध्ये विदीथ गुजराथीने काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना अमीन बसीम वर विजय संपादन केला! या विजयामुळे अडीच गुणांसह विदीथ गुजराथी आणि कोरोबॉव याच्यासह संयुक्तरीत्या आघाडीवर आहे! पटावर चांगली परिस्थिती असून देखील हरिका द्रोणावल्ली हिचा विजय हुकला आणि तिला ला ए’मी विरुद्ध बरोबरी वर समाधान मानावे लागले!

विश्वनाथन आनंद विरुद्ध कारुआना  
लंडन चेस क्लासिक २०१७ च्या आवृतीत आनंद कारुआना कडून पराभूत झाला होता! या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आनंद उत्सुक होता! विश्वनाथन आनंदच्या पांढर्‍या मोहर्‍यां विरुद्ध कारुआनाने पेट्रॉफ बचाव पद्धत अवलंबली. डावाच्या मध्य पर्वात कारुआनाने गुंतागुंतीची व्यूहरचना केली आणि आनंदला चांगलेच पेचात टाकले! ही व्यूहरचना आनंदने अचूकपणे हेरली आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यानंतरच्या दोन चालींसाठी त्याने तब्बल ४० मिनिट विचार केला! आणि तिथपासूनच आनंदची बाजू भक्कम होत गेली.

सर्वप्रथम आनंदने कारुआना ला आपल्या अश्वाच्या बदल्यात काळ्या घरातील उंट देण्यास भाग पाडले! त्यानंतर डाव मोकळा करण्यासाठी कारुआनाच्या दोन अश्वांच्या बदल्यात आनंदने कारुआनाला आपल्या एका प्याद्याचा आणि हत्तीचा बळी दिला (एक्स्चेंज सॅक्रिफाइस)!

थोडाफार बचावात्मक खेळ केल्याचा फटकाही कारुआनाला बसत होता तसेच तो चाली पूर्ण करण्यासाठी वेळेच्या कचाट्यात देखील अडकला! वेळेच्या कचाट्यात अडकलेल्या कारुआनाने वेळेअभावी कमकुवत चाली रचल्या! ह्या चुकांचा फायदा आनंदने उठवला! संगणकाप्रमाणे अचूक चाली रचत आनंदने डावाचे पारडे आपल्याकडे झुकवले! 

पराभव अटळ आहे असे लक्षात येताच कारुआनाने शरणागती पत्करली आणि आनंदने पूर्ण गुण वसुल करीत स्पर्धेत आघाडी घेतली. तसेच कारुआना कडून लंडन चेस क्लासिक २०१७ च्या आवृतीत झालेल्या पराभावाची सव्याज परतफेड केली!

तिसऱ्या फेरीअखेर गुणतालिका
1. आनंद आणि अनिष गिरी - 2.5 गुण
2. कार्लसन, मामेद्यारोव, गॅविन जोन्स - 2 गुण प्रत्येकी
3. वेस्ली सो, सर्जी कॅराकिन, पीटर स्विडलर, क्रॅमनिक - 1.5 गुण प्रत्येकी
4. कारुआना, मॅटलॅकॉव, वे यी - 1 गुण प्रत्येकी
5. अधिबन, हू यिफान - 0.5 गुण प्रत्येकी

मंगळवार 16 जानेवारी 2018 रोजी - अशी रंगेल चौथी फेरी
अधिबन भास्करन वि. आनंद
अनिष गिरी वि. मॅग्नस कार्लसन 
सर्जी कॅराकिन वि. मामेद्यारोव
वे यी वि. गॅविन जोन्स 
कारुआना वि. वेस्ली सो
हू यिफान वि. मॅक्सिम मॅटलॅकॉव
क्रॅमनिक वि. पीटर स्विडलर

Web Title: Marathi news news london holand news wishwanath anand wins 80th tata steal chess competition