बलाढ्य सौराष्ट्रशी आजपासून भिडणार महाराष्ट्र 

बलाढ्य सौराष्ट्रशी आजपासून भिडणार महाराष्ट्र 

नाशिक- रणजी स्पर्धेच्या "अ'गटात आणि गुणतालिकेतही अव्वल असलेल्या बलाढ्य सौराष्ट्र संघाशी उद्या(ता.14) पासून महाराष्ट्र संघाशी गाठ पडणार आहे. आघाडी आणि निर्विवाद विजयासाठी महाराष्ट्राला ही लढत महत्वाची असून अष्टपैलू केदार जाधव,कर्णधार अंकित बावणे,राहुल त्रिपाठी आणि घरच्या मैदानावर खेळणाऱ्या नाशिककर सत्यजित बच्छाववर मदार आहे. दुसरीकडे विजयी परंपरा कायम राखण्यासाठी सौराष्ट्रची धडपड असेल. लोढा समिती व बीसीसीआयच्या बदललेल्या नियम,धोरणानुसार होणाऱ्या या लढतीवर सुक्ष्म कॅमेऱ्याची नजर असेल. 

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची खेळपट्टी महाराष्ट्र संघासाठी कायमच "लकी' राहिलेली आहे. आतापर्यतच्या सामन्यांसाठी महाराष्ट्रच्या क्‍युरेटरच्या मार्गदर्शनाखाली खेळपट्टी तयार केली जात. मात्र यंदा बीसीसीआयचे क्‍युरेटर रमेश म्हामुनकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजी,गोलंदाजांना अनुकूल ठरेल अशी समतोल खेळपट्टी तयार करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र-सौराष्ट्र हा सामना निश्‍चित निकाली निघेल यात शंका नाही. आज सकाळी दोन-अडीच तास दोन्ही संघानी कसून सराव केला. नाणेफेकीचा कौल महाराष्ट्राच्या बाजूने लागल्यास मोठी धावसंख्या उभारण्याचे ध्येय संघासमोर असेल. त्यात न्युझीलंडला गेलेला कर्णधार अंकित बावणे,केदार जाधव,उपकर्णधार राहुल त्रिपाठी,चिराग खुराणा,अनुपम संकलेचा यांच्यावर फलंदाजीची तर सत्यजित बच्छाव,अक्षय पालकर,समद फल्लाह,मंदार शंडारी,नौशाद शेख यांच्यावर गोलंदाजीची भिस्त आहे. 

केदार,अंकीतच्या समावेशामुळे मनोधैर्य उंचावले 
यापूर्वीच्या सामन्यात महाराष्ट्राने मुंबईवर पहिल्या डावाच्या आघाडीने वर्चस्व राखले. त्यातच आता अष्टपैलू केदार जाधव व अंकितचा समावेश असल्याने संघाचे मनोधैर्य उंचावले आहे. त्यामुळे सराव सत्रातही या संघाचा आत्मविश्‍वास उंचावलेला दिसत होता. पात्रता फेरी गाठण्यासाठी महाराष्ट्राला पुढील सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने नाशिकच्या सामन्यापासून नियोजन केले असल्याचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी सांगितले. 

सौराष्ट्रचे पात्रता फेरीसाठी प्रयत्न 
महाराष्ट्र-सौराष्ट्र हे दोन्ही संघ नाशिकला प्रथमच आमने-सामने आले आहे. आपला सहावा सामना खेळणाऱ्या सौराष्ट्रने दोन सामन्यात निर्विवाद विजय संपादन केल्याने तसेच इतर चार सामन्यात आघाडी घेत वर्चस्व राखले. त्यामुळे 19 गुणांसह गटात ते अव्वल आहे. आता उर्वरित सामन्यापेक्षा पात्रता फेरीच्यादृष्टीने त्यांनी नियोजन केले असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. 

विनामूल्य प्रवेश,शिर्केची दोन दिवस उपस्थिती 
उद्या(ता.13) सकाळी पावणेनऊला खासदार,आमदार,महापौर यांच्यासह जिल्हाधिकारी, विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाणेफेक होईल. तत्पूर्वी फुगे सोडून या सामन्याचे औपचारिक उद्घाटन होणार असून त्यानंतर साडेनऊला सामना सुरु होईल. या स्पर्धेच्यानिमित्ताने जेष्ठ क्रीडासंघटक,महाराष्ट्र्रिकेट संघटनेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य अजय शिर्के हे दोन दिवस नाशिकमध्ये उपस्थित राहणार आहे. नाशिककरांना सामन्याचा आनंद घेता यावा,यासाठी सामना विनामूल्य प्रवेश असेल. जास्तीत जास्त नाशिककरांना सामन्याचा आनंद घ्यावा,असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

बीसीसीआयची करडी नजर 
गेल्या वर्षीपासून बीसीसीआयने कडक धोरण अवलंबिले आहे. दोन्ही संघाचे ड्रेसिंग रूम,पॅव्हेलियन,मिडीया कक्ष,प्रथमोपचार,धावफलक,ध्वनिक्षेपक व्यवस्थायासह इतर सर्व बाबींवर बीसीसीआयचे कॅमेऱ्यांद्वारे करडी नजर असेल. त्यासाठी व्हिडीओ ऍनालिस्टसह काही महत्वाच्या अधिकारी,निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते दिवसभर सामनास्थळी उपस्थित राहून या नोंदी करून बीसीसीआयला आपला अहवाल देतील. 

महाराष्ट्राकडून प्रतिनिधीत्व केलेले नाशिकचे रणजी खेळाडू 
जिभाऊ जाधव,बाळ दाणी,चंदु गडकरी,अन्वर शेख,बी.जयंतीलाल,प्रकाश माळवे,राजु लेले,सलील अंकोला,रमेश वैद्य,प्रशांत राय,भगवान काकड,शेखर गवळी, अमित पाटील,अभिषेक राऊत,सुयश बुरकुल,सलील आघारकर,साजित सुरेशनाथ,सत्यजित बच्छाव,मुर्तुझा ट्रंकवाला 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com