esakal | मी बोलते ते रॅकेटनेच : अंकिता रैना
sakal

बोलून बातमी शोधा

Ankita Raina

मी बोलते ते रॅकेटनेच : अंकिता रैना

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ''मी भारताची अव्वल महिला टेनिसपटू आहे. 'टॉप्स' योजनेतून मला का वगळले हे ठाऊक नाही. कसून सराव करायचा आणि बोलायचे ते रॅकेटनेच असा माझा दृष्टिकोन आहे,' असे जिगरबाज अंकिता रैनाने सांगितले. फेडरेशन करंडक जागतिक महिला सांघिक स्पर्धेत अंकिताने लागोपाठ दोन दिवस सरस प्रतिस्पर्ध्यांना हरवीत क्षमतेची चुणूक दाखविली. 

जागतिक क्रमवारीत 25 वर्षांची अंकिता 253व्या क्रमांकावर आहे. तिने 120व्या क्रमांकावरील चीनच्या लीन झू हिला दोन सेटमध्येच, तर 81व्या क्रमांकावरील कझाकस्तानच्या युलिया पुतीनत्सेवाला तीन सेटमध्ये हरविले. यातील युलीया गेल्या वर्षी 27व्या क्रमांकावर होती. तिने फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. 

अंकिताने या कामगिरीबद्दल सांगितले की, 'मी अशा विजयाच्या प्रतीक्षेत होते आणि तो देशासाठी खेळताना या स्पर्धेत मिळाल्याचा अभिमान वाटतो. मी बेसलाईनलगत फटके मारण्याचा सराव करीत होते. प्रत्यक्ष सामन्यात हे जमणे महत्त्वाचे होते. त्यात मी यशस्वी ठरले. तंत्रासाठी मी हेमंत बेंद्रे व तंदुरुस्तीसाठी ट्रेनर गौरव निझोन यांच्यासह बरीच मेहनत केली आहे. या स्पर्धेत दीर्घ रॅलींमध्ये झालेला माझा खेळ विलक्षण समाधान देणारा आहे. आता हे सातत्याने करण्याचा आत्मविश्‍वास गवसल्यासारखा वाटतो.' 

अंकिताने युलियावरील विजयानंतर स्टॅंडमधील आई ललिता यांना आलिंगन दिले. त्या वेळी अंकिताला आनंदाश्रू रोखता आले नाहीत. आपल्या कारकिर्दीसाठी आईने बराच संघर्ष केला असल्यामुळे असे भरून येणे स्वाभाविक असल्याची भावना तिने व्यक्त केली. 

अंकिताला गेल्या वर्षी 'टॉप्स'साठी (टार्गेट ऑलिंपिक पोडीयम स्कीम) वगळण्यात आले. दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू कर्मन कौर थंडी, दुहेरीतील स्पेशालिस्ट प्रार्थना ठोंबरे आणि अनुभवी सानिया मिर्झा यांचा समावेश झाला. राष्ट्रीय निरीक्षक सोमदेव देववर्मन याने नावांची शिफारस करतानाच अंकिताने काहीही प्रगती दाखविली नसल्याचा शेरा मारल्याचा खुलासा 'आयटा'ने (अखिल भारतीय टेनिस संघटना) केला. त्यानंतर अखेर अंकिताच्या नावाचा समावेश झाला, पण आर्थिक मदतीच्या यादीत तिचे नाव अद्याप नाही. अंकिताने राष्ट्रीय विजेतेपद व देशासाठी पदक मिळविले नसल्याचे कारणही 'आयटा'ने दिले. प्रत्यक्षात तिने 2009 मध्ये कोलकत्यात राष्ट्रीय ग्रास कोर्ट स्पर्धा जिंकली होती, तर गेल्या वर्षी प्रार्थनाच्या साथीत अश्‍गाबाटमधील (तुर्कमेनिस्तान) आशियाई इनडोअर स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. 

मी भारताची अव्वल खेळाडू बनले. डब्ल्यूटीए स्पर्धांमध्येही मी चांगली कामगिरी केली. अशावेळी मला वगळण्याचे कारण नव्हते. माझा देवावर विश्‍वास आहे. तो प्रत्येक गोष्टी बघत असतो. मला न्याय मिळेल याची खात्री आहे. 
- अंकिता रैना

loading image