esakal | गोलंदाजांनी अपेक्षापूर्ती केली; पण आम्ही सगळं गमावलं.. : कोहली 
sakal

बोलून बातमी शोधा

गोलंदाजांनी अपेक्षापूर्ती केली; पण आम्ही सगळं गमावलं.. : कोहली 

गोलंदाजांनी अपेक्षापूर्ती केली; पण आम्ही सगळं गमावलं.. : कोहली 

sakal_logo
By
सुनंदन लेले

केप टाऊन : पावसामुळे एका संपूर्ण दिवसाचा खेळ वाया जाऊनही भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिला क्रिकेट कसोटी सामना चार दिवसांतच आटोपला. तीन दिवसांच्या या खेळात 40 फलंदाज बाद झाले आणि त्यातील 18 फलंदाज तर कालच्या एका दिवसातच बाद झाले. यजमान संघाने पहिला सामना जिंकत मालिकेत महत्त्वाची आघाडी घेतली. 'फलंदाजांची भागीदारी झालीच नाही, तर धावा जमा होणार कशा? दोन्ही डावांत फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. संघाच्या पराभवाला आम्ही फलंदाजच जबाबदार आहोत', अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर व्यक्त केली. 

'मायदेशात धावांचे डोंगर उभारणाऱ्या भारईय फलंदाजांना परदेश दौऱ्यात काय धाड भरते' हा प्रश्‍न क्रिकेटप्रेमींना सतावत आहे. '208 धावांचा पाठलाग करणे शक्‍य नसेल, तर कसोटी सामना जिंकायचे स्वप्न पाहायचे तरी कशाला' असे बहुतांश पाठिराख्यांना वाटते. केपटाऊनच्या निसर्गसुंदर न्यूलॅंड्‌स मैदानावरून कसोटी सामन्याचे वार्तांकन करताना एक गोष्ट स्पष्टपणे दिसत होती.. कागदावर 'फक्त' वाटणाऱ्या 208 धावा प्रत्यक्षात खूप 'मोठ्या' होत्या. 

"गोलंदाजांनी अपेक्षापूर्ती केली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्या डावात आघाडी मिळाली असली, तरीही दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाजांमुळेच भारतीय संघाचे सामन्यात पुनरागमन झाले. पदार्पणातच जसप्रित बुमराहने केलेली गोलंदाजी कौतुकास पात्र आहे. पण आम्ही फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. त्यामुळे पराभवाला आम्हीच जबाबदार आहोत, असे मला वाटते', असे विराट म्हणाला. 

फलंदाजांच्या समस्येबद्दल कोहली म्हणाला, "लागोपाठ दोन फलंदाज बाद झाले, तरीही सामन्याचा कल बदलतो. आम्ही तर दोन्ही डावांत लागोपाठ तीन-चार विकेट्‌स गमावल्या. मग डाव सावरणार तरी कसा? पहिल्या कसोटीत आम्ही चांगली भागीदारी आम्ही रचू शकलो नाही. मी खेळपट्टीला अजिबात दोष देणार नाही. न्यूलॅंड्‌सची विकेट कसोटीसाठी उत्तम होती. गोलंदाजांचा सामन्यावर वरचष्मा दिसत असला, तरीही प्रयत्न करणाऱ्या फलंदाजाला धावा करणे अशक्‍य नव्हते. प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा मारा प्रभावी होत असताना फार बचावात्मक खेळून चालणार नाही. गोलंदाजांची लय बिघडवायला आम्हाला काहीतरी वेगळा पवित्रा घ्यावा लागेल. पहिल्या 30 षटकांपर्यंत तग धरला, तर नंतर चांगल्या धावा करता येऊ शकतात.'' 

"कसोटीमध्ये चांगली धावसंख्या उभारण्यासाठी दोन उत्तम भागीदारी होणे गरजेचे असते' असे मत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. 'आपल्या गोलंदाजांनी खतरनाक मारा करून दक्षिण आफ्रिकेला हादरवले होते. फलंदाजांनी त्यांना थोडी साथ द्यायला हवी होती. पण मला खात्री आहे, फलंदाजांना त्यांच्या चुका समजल्या आहेत आणि आम्ही एकत्रित प्रयत्न करून चांगल्या उपाययोजना करू', असेही शास्त्री म्हणाले. 

संघातील काही खेळाडूंनी आज (मंगळवार) सराव केला. थकलेल्या वेगवान गोलंदाजांनी विश्रांती घेणे पसंत केले. काही खेळाडूंनी सायंकाळी केपटाऊनमध्ये फेरफटका मारला. 

कफ सिरपने युसूफचा घात केला.. 
उत्तेजक द्रव्य सेवनाबद्दल युसूफ पठाणवर सहा महिन्यांची बंदी लादण्यात आली, ही बातमी कानावर पडल्यावर आश्‍चर्य वाटले. युसूफ आणि इरफान पठाण हे बंधू उत्तेजक द्रव्य तर सोडाच; पण कोणत्याही प्रकारच्या व्यवनांपासून दहा हात लांब असतात, हे खात्रीलायकरित्या माहीत होते. 

यासंदर्भात दक्षिण आफ्रिकेहून युसूफशी संपर्क साधला. "महत्त्वाचा सामना तोंडावर आला असताना सर्दी-खोकला जात नव्हता. म्हणून सामना खेळताना त्रास होऊ नये, यासाठी कफ सिरप घेतले. बहुदा त्याची मात्रा जास्त झाली. नेमकी त्याच दिवशी आमची चाचणी झाली आणि माझ्या चाचणीत नियमांना ओलांडणाऱ्या घटकांचे अंश सापडले. असे काही होते, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. जे झाले ते झाले! मी या सगळ्या गोष्टींपासून किती लांब असतो, हे तुला माहीत आहे. रणजी मोसमाच्या पहिल्याच सामन्यात मी दोन्ही डावांत शतक केले होते. त्यामुळे खूप उत्साह होता आणि त्यात असे झाले..! एक बरे आहे, की माझी शिक्षा संपत आली आहे आणि लवकरच मी सामना खेळेन'', असे युसूफ म्हणाला.. 

loading image
go to top