अंतर्गत वादाचा नाशिक महिला कबड्डी संघाला फटका 

live
live

सिन्नर-  नाशिकचा महिला कबड्डी संघ उपांत्यपूर्व सामन्यात रत्नागिरीकडून पराभूत झाल्यानंतर अंतर्गत वाद उफाळला. सामन्यानंतर संघातील एका खेळाडूने मैदानावरच थेट प्रशिक्षकाला उद्धटपणे, अर्वाच्च भाषेत सुनावले. एवढ्यावरच न थांबता अगदी जुने संदर्भ देत शिव्याची लाखोली वाहिली. मैदानावरील या वादाने साऱ्याचेच लक्ष वेधले.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी तसेच समारोप सत्रात गोंधळ टाळण्यासाठी काहींनी पुढाकार घेत नाशिक संघाची मध्यरात्रीच रवानगी करण्याचे ठरले. एवढेच नव्हे तर नाशिक-सिन्नर मार्गावर संघातील काही खेळाडू घेऊन रस्त्यावरच वाहन व इतर मदतीसाठी उभ्या राहिलेल्या खेळाडू, प्रशिक्षकांचे वागणुकीचे हे नाट्य पाहायला मिळाले. दुसरीकडे कबड्डी संघटनेचे पदाधिकारी या साऱ्या प्रकाराबद्दल अनभिज्ञ होते. 

शनिवारी (ता. 3) यजमान नाशिक विरुद्ध रत्नागिरी यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्यानंतर हा अंत्यत लाजिरवाणा प्रकार घडला असला तरी याची प्रशिक्षक खेळाडूची ही खदखद, वाद स्पर्धेपूर्वी झालेल्या प्रशिक्षण शिबिरापासून सुरूच होते. नाशिक जिल्हा महिला कबड्डी संघात रचना, गुलालवाडी व क्रीडाप्रबोधिनी यातील खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंपैकीच अपेक्षा मोहिते या रचना क्‍लबच्या खेळाडूने हा सर्व गोंधळ घातला. या वादाला रचना, गुलालवाडीच्या इतर खेळाडूंचीही फूस होती. सामन्यानंतर मैदानावरच अपेक्षा मोहिते हिने क्रीडासंकुलात क्रीडाप्रबोधिनीचे केंद्र चालविणाऱ्या भारती जगताप व संघ प्रशिक्षक सारिका जगताप यांच्याशी उद्धटपणे मोठ्याने बोलण्यास सुरवात केली. अर्वाच्च भाषेचा वापर केला. हे सारं इतर संघाच्या प्रशिक्षक, खेळाडूंसमोरच सुरू होते. दोन्हीही जगतापांनी निमूटपणे अपेक्षाचे बोलणे ऐकून घेतले. मैदानावर वाद नको म्हणून काहींनी संबंधित खेळाडू, प्रशिक्षक व संघातील इतरांना बाहेर नेले. मात्र तेथेही गोंधळ सुरूच होता. 

मुले अंगावर धावून गेली, स्वयंसेवकांचा पुढाकार 
नाशिकहून कबड्डी सामना पाहण्यासाठी आलेल्या काही पुरुष खेळाडूंचे वाद वाढत आहेत, हे लक्षात येताच त्यांनी संबंधित खेळाडूला समजावले. मात्र ऐकण्याच्या मनःस्थितीत नसलेल्या अपेक्षाने हुज्जत घालणे सुरूच ठेवले. त्या वेळी मात्र हे पुरुष खेळाडू तिच्या अंगावर धावून जात असताना संयोजनात असलेल्या सह्याद्री युवा महिलांच्या काही स्वयंसेवकांनी पुढाकार घेत हा वाद मिटवला. पण तरीही वाद सुरूच राहिला. अगदी खेळाडू-प्रशिक्षकांच्या जेवणाच्या ठिकाणीही त्याचे पडसाद उमटले. 

इतर खेळाडूंचे खच्चीकरणाने पराभव, प्रशिक्षकाचे नियम 
नाशिक महिला कबड्डी संघातील इतर खेळाडूंना अपेक्षाने टाकून बोलणे, दुय्यम वागणूक देणे यामुळे त्यांचे खच्चीकरण झाले होते. त्यातच प्रशिक्षकांच्या सूचनांकडे लक्ष न दिल्याने तसेच सरावात अडथळा आणणे या सर्वांचा परिणाम नाशिक संघावर झाला. उपांत्य फेरीतील एक दावेदार म्हणून नाशिक संघाकडे पाहिले जात होते. मात्र हा संघ रत्नागिरी विरुद्धचा सामना हरला. प्रशिक्षक सारिका जगताप यांनी स्पर्धेदरम्यान खेळाडूंचे मोबाईल जमा करून घेतले होते, त्यावरूनही बराच वाद झाला. 

प्रशिक्षकांचे फोन; वाद मिटविण्याची धडपड, कारवाईची मागणी 
नाशिक महिला संघाचा हा वाद वाढतच असल्याचे लक्षात येताच रचना क्‍लबच्या एक माजी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांनी दूरध्वनी करून स्पर्धेच्या संयोजनात असलेल्यांना हा वाद मिटवला. रचनाच्या खेळाडूंना तातडीने नाशिकला पाठविण्यासाठी धडपड सुरू होती. खेळाडू ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. प्रशिक्षक आपल्याच तोऱ्यात होते. संघ व्यवस्थापक घरी पोचले होते आणि शहर जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना याचा काहीच थांगपत्ता नव्हता. इतर खेळाडू, प्रशिक्षकांच्या समोर झालेला हा सारा प्रकार यजमान नाशिकसाठी लांच्छनास्पद असाच होता. नाशिकच्या पराभवाची ही कारणमीमांसा लक्षात घेऊन जिल्हा, राज्य संघटनेने संबंधितांवर कारवाई करावी. त्यामुळे इतरांना जरब बसेल, अशी मागणी होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com