चाचणीशिवाय मेरी कोमची निवड झालीच कशी?

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

 जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेसाठी मेरी कोमची निवड चाचणीविना केल्यामुळे निखत झरीन संतापली आहे.

नवी दिल्ली - जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेसाठी मेरी कोमची निवड चाचणीविना केल्यामुळे निखत झरीन संतापली आहे. माजी कुमारी जगज्जेतीने याबद्दल संघटनेस ठोसे दिले आहेत. 

मेरी कोमने इंडिया ओपन तसेच इंडोनेशिया स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्यामुळे तिची जागतिक स्पर्धेसाठी 51 किलो गटाच्या स्पर्धेसाठी निवड केली.(ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) तिच्याचबरोबर लोवलिना बोर्गोहैन हिलाही निवडण्यात आले. या दोघींची चाचणी न घेताच निवड झाली आहे. 

निखतने थायलंड स्पर्धेत रौप्य जिंकले होते. ती 51 किलो गटाच्या चाचणीत मेरीला आव्हान देईल, अशी अपेक्षा होती; मात्र ती मेरीला आव्हान देण्यापूर्वीच तिला वनलाल दुआती हिच्याविरुद्ध खेळण्यापासून रोखण्यात आले. निवड समितीचे प्रमुख राजेश भंडारी यांनी हा निर्णय घेतला, असा आरोप निखतने केला आहे. जागतिक स्पर्धेसाठी मेरीची निवड करण्याचा निर्णय यापूर्वीच झाल्याचा दावा भंडारी यांनी केला आहे. 

मेरीचे मार्गदर्शक छोटेलाल यादव यांनी मेरीची चाचणी न घेण्याची विनंती केली. त्यासंदर्भात विचार केल्यानंतर आम्ही तिची निवड करण्याचे ठरवले. मेरीने इंडिया ओपन स्पर्धेत निखतला हरवले होते. राष्ट्रीय शिबिरात मेरी सतत सरस ठरली आहे, असे भंडारी यांनी सांगितले. 

मेरीची जागतिक स्पर्धेसाठी निवड करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला आहे. ती अनुभवी आहे. तिने आठ स्पर्धांत सहा पदके जिंकली आहेत. पदक विजेत्यांनाच पसंती द्यायला हवी. 
- राजेश भंडारी, निवड समितीप्रमुख 

निवड चाचणी सुरू होण्यास काही वेळ असतानाच मला या गटाच्या निवडीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. भविष्याचा विचार करून मला राखीव ठेवण्याचे ठरले असल्याचे सांगण्यात आले. दोन जागतिक स्पर्धांत मी खेळले आहे, मग आत्ताच काय झाले? 
- निखत झरीन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mary Kom have been selected for the womens world boxing championships