India Vs Spain HWC 2023 : भारताने फोडला विजयाचा नारळ! स्पेनचा पहिल्याच सामन्यात धुव्वा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Vs Spain HWC 2023

India Vs Spain HWC 2023 : भारताने फोडला विजयाचा नारळ! स्पेनचा पहिल्याच सामन्यात धुव्वा

India Vs Spain HWC 2023 : पुरूष हॉकी वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारताने स्पेनचा 2 - 0 ने पराभव करत विजयी मोहिम सुरू केली. भारताने रोऊरकेला येथे झालेल्या आपल्या पहिल्या सामन्यात पहिल्या हाफपासूनच सामन्यावर पकड निर्माण केली होती. भारताकडून अमित रोहिदास आणि हार्दिक सिंग यांनी स्पेनचा गोलपोस्ट भेदला.

हेही वाचा: Sania Mirza : ग्रँडस्लॅम विजयाचा 'षटकार' मारणारी सानिया टेनिस कोर्टला करणार अलविदा!

पहिला हाफ : भारताने उघडले खाते

पहिल्या क्वार्टरपासून चेंडूवर भारतीय हॉकी संघाने सॉफ्ट पासिंगद्वारे ताबा मिळवला होता. त्यांनी गोल करण्याच्या काही संधी देखील निर्माण केल्या. मात्र त्यांना गोल करण्यात यश आले नाही. दरम्यान पहिल्या क्वार्टरच्या 12 व्या मिनिटाला भारताने आपल्या गोलचे खाते उघडले. भारताला पेनाल्टी कॉर्नर मिळाला होता. कर्णधार हरमनप्रीत सिंगने अमित रोहिदासला एक उत्कृष्ठ पास दिला. यावर अमित रोहिदासने भारताचा वर्ल्डकपमधील 200 वा गोल करत भारताला 1 - 0 अशी आघाडी मिळवून दिली.

यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये देखील भारताने आपले वर्चस्व कायम राखले. दुसरा क्वार्टर संपण्यास अवघी काही मिनिटे शिल्लक असताना हार्दिक सिंगने ड्रिबलिंगच्या सहाय्याने जबरदस्त गोल नोंदवला. भारताने स्पेनचा दुसऱ्यांदा बचाव भेदत 2 - 0 अशी आघाडी घेतली.

दुसरा हाफ : भारताने संधी दवडली

तिसऱ्या क्वार्टरमध्ये देखील भारताला गोल करण्याची नामी संधी मिळाली होती. भारताला पेनाल्टी शूटआऊट मिळाला होता. मात्र कर्णधार हरमनप्रीत सिंगला स्पेनचा गोलपोस्ट भेदता आला नाही. स्पेनच्या गोलकिपरने कर्णधाराचा फटका उत्कृष्टरित्या आडवला. चेंडू लाईनला टच होत होता मात्र रेफ्रीने गोल बहाल केला नाही.

चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने आघाडी वाढवण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यात सुरूवातीला यश आले नाही. त्यात भारताचा खेळाडू अभिषेकला रेफ्रींनी यलो कार्ड दाखवले. अखेर भारताने स्पेनचा 2 - 0 असा पराभव करत वर्ल्डकपची विजयी सुरूवात केली.

(Sports Latest News)

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'