बहरलेल्या लिओनेल मेस्सीचे दोन गोल

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

दुखापतीतून पूर्णपणे बरे झालो आहोत, हे दाखवताना लिओनेल मेस्सीने दोन गोल केले, तसेच अन्य दोन गोलांत मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळे बार्सिलोनाने ला लिगा अर्थात स्पॅनिश फुटबॉल साखळीत रेयाल वॅलादॉलिदचा 5-1 असा पाडाव केला.

बार्सिलोना : दुखापतीतून पूर्णपणे बरे झालो आहोत, हे दाखवताना लिओनेल मेस्सीने दोन गोल केले, तसेच अन्य दोन गोलांत मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळे बार्सिलोनाने ला लिगा अर्थात स्पॅनिश फुटबॉल साखळीत रेयाल वॅलादॉलिदचा 5-1 असा पाडाव केला.

मेस्सीने फ्री किकवर पहिला गोल केला. त्याच्या अचूक वेगवान पासमुळे आर्तर विदाल याला दुसरा गोल करता आला. मेस्सीच्या अचूक स्लाईडवर लुईस सुआरेझने गोल केला, तसेच मेस्सीने सामन्याच्या अखेरच्या मिनिटात चेंडूला अचूक दिशा दिली होती. या चार गोल व्यतिरिक्त प्रतिस्पर्ध्यांवरील दडपण, त्याचे फ्लीक्‍स, ड्रिबल्स आणि अविश्‍वसनीय पास वाढवत होते. मेस्सीच्या पायात जादू आहे. आपण त्याचे कौतुक करीत आनंद घेऊ शकतो, असे बार्सिलोनाचे मार्गदर्शक एरनेस्टो वालवेर्दे यांनी सांगितले.

बार्सिलोनातील निदर्शनामुळे त्यांची रेयालविरुद्धची लढत लांबणीवर पडली. त्यामुळे मेस्सीला जवळपास एका आठवड्याचा ब्रेक मिळाला. अर्थात लढत सुरू होण्यापूर्वी निदर्शनाचे काहीसे पडसाद उमटले होते. मात्र मेस्सी मॅजिक सुरू झाल्यावर त्याचा विसर पडला. आता गुणतक्‍त्यात बार्सिलोना आणि ग्रॅनाडा संयुक्त अव्वल आहेत, पण बार्सिलोना एक लढत कमी खेळले आहेत.

इंटर मिलान अव्वल
रोम ः इंटर मिलानने सिरी ए अर्थात इटालीयन साखळीत अव्वल क्रमांक मिळवताना ब्रेसियाचा 2-1 असा पराभव केला. त्यांनी जेतेपदाच्या शर्यतीत युव्हेंटिसला मागे टाकले आहे. मिलानला एका स्वयंगोलाचा फटका बसला, पण याची चर्चा सुरू झाल्यावर मिलान मार्गदर्शकांनी आमच्या संघावर नऊ दिवसांत चार सामने खेळण्याची वेळ आणल्याची तक्रार केली. आम्ही इंजिन चालवण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहोत, ही सतत कशी लावत राहणार, अशी विचारणा त्यांनी केली.

मॅंचेस्टर सिटी उपांत्यपूर्व फेरीत
लंडन ः सर्गिओ ऍग्यूएरा याच्या दोन गोलमुळे मॅंचेस्टर सिटीने साऊदम्प्टनचा 3-1 असा पराभव करीत लीग कपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिटीने आपल्या संघात नऊ बदल केले होते, तरीही त्यांनी बाजी मारली. लिस्टरविरुद्धच्या 0-9 पराभवातून साऊदम्प्टन पूर्ण सावरले नसल्याचे सिटीच्या पथ्यावर पडले. एव्हर्टन तसेच लिस्टर सिटीनेही आगेकूच केली.

बायर्न बचावले
बर्लिन ः बायर्न म्युनिचने जर्मन कप स्पर्धेतील गच्छंती थोडक्‍यात टाळली. द्वितीय श्रेणीतील बोशुमविरुद्ध अखेरच्या सात मिनिटांतील दोन गोलमुळे बायर्नची सरशी झाली. त्यापूर्वी ते एका गोलने मागे होते. बायर लिव्हरकुसेन तसेच शेल्के यांनाही निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले. बंडेस्लिगा प्रथमच खेळणाऱ्या युनियन बर्लिनने फ्रेईबर्गविरुद्ध 3-1 असा विजय मिळवला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: messi anchors barcelona win