esakal | VIDEO: अविस्मरणीय क्षण! रडणाऱ्या नेमारला मिठी मारत मेस्सीने जिंकली मनं
sakal

बोलून बातमी शोधा

messi

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत विजेत्या ब्राझीलला मेस्सीच्या अर्जेंटिनाने मोठा धक्का दिला. अर्जेंटिनाने नवा इतिहास रचला आहे. 28 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अर्जेंटिनाने Copa America 2021 कपवर आपले नाव कोरले आहे.

भावा तू मनंही जिंकलस; रडणाऱ्या नेमारला मेस्सीची 'भावूक' मिठी

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

Copa America 2021 Final : घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत विजेत्या ब्राझीलला मेस्सीच्या अर्जेंटिनाने मोठा धक्का दिला. अर्जेंटिनाने नवा इतिहास रचला आहे. 28 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अर्जेंटिनाने Copa America 2021 कपवर आपले नाव कोरले आहे. ज्यूनियर नेमारच्या ब्राझीलला अर्जेंटिनाने 1-0 असे पराभूत केले. डी मारियाने 21 व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळं अर्जेंटिनाने बाजी मारली. जवळपास तीन दशकांच्या प्रतिक्षेनंतर मिळालेल्या या विजयनंतर अर्जेंटिनाने मोठा जल्लोष केला. दुसरीकडे घरच्या मैदानात हरलेल्या ब्राझीलवर निराशा पसरली होती. ब्राझीलसाठी खरंतर हा धक्का होता. (Messi hugged by sobbing Neymar in moment of respect after Argentina Copa America triumph)

विजयानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी मेस्सीला उचलून घेतले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद ओसंडून वाहत होता, तर ब्राझीलच्या खेळाडूंना अश्रू अनावर झाले होते. स्टार खेळाडू नेमार याला मैदानातच रडू कोसळले. त्याला आपले अश्रू रोखता आले नाहीत. यावेळी दिसलेले दृश्य सर्वांच्या स्मरणात राहील असेच होते. दु:खात बुडालेल्या नेमारला पाहून अनेकजण त्याला आलिंगन देऊन त्याचे सांत्वन करत होते. पण, एका दृश्याने मैदानातील सर्व प्रेक्षकांना एका अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार केले. रडणाऱ्या नेमारला पाहून मेस्सीने त्याला मिठी मारली. जवळपास एक मिनिटाचे हे दृश्य पाहून प्रेक्षक भारवले नसतील तर नवलच.

हेही वाचा: मेस्सीचं स्वप्न साकार; 28 वर्षांनी अर्जेंटिनाने जिंकली फायनल!

अंतिम सामन्याच्या आधीच नेमार आणि मेस्सीला कोपा अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून जाहीर करण्यात आले होते. नेमारने दोन गोल केले आणि तीन गोल करण्यास मदत केली. मेस्सीने चार गोल केले आणि पाचवेळा गोल करण्यास मदत केली होती. कोपा अमेरिकेच्या स्पर्धेदरम्यान नेमार आणि मेस्सी यांच्या खेळीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण, मोठ्या प्रतिक्षेनंतर मेस्सीने देशासाठी मोठी ट्रॉफी जिंकून दिली.

दरम्यान, दोन वेगवेगळ्या गटातून फायनलमध्ये पोहचलेल्या अर्जेंटिना आणि ब्राझील यांच्यात माराकाना स्टेडियमवर फायनल सामना रंगला होता. यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक 4 गोल करणाऱ्या मेस्सीला अखेरच्या सामन्यात गोल डागता आला नाही. पण देशासाठी मोठी स्पर्धा न जिंकण्याचा त्याच्यावरील ठपका या विजयाने पुसला गेलाय. मेस्सीने अर्जेंटिनाकडून 4 वर्ल्ड कप आणि 6 कोपा अमेरिकन स्पर्धेत भाग घेतला. मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर मेस्सीने देशासाठी मोठी ट्रॉफी जिंकून दिली.

loading image