भारताचे प्रशिक्षकपद अन्यथा पाकिस्तानचे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

माईक हेसन हे भारत; तसेच पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत; त्यामुळेच त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मार्गदर्शकपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे.

नवी दिल्ली : माईक हेसन हे भारत; तसेच पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत; त्यामुळेच त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मार्गदर्शकपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे.

हेसन यांच्याकडे गतवर्षी ऑक्‍टोबरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने मार्गदर्शकपद दिले होते. त्यांनी ट्‌विटरद्वारे राजीनामा देत असल्याची घोषणा केली. हेसन हे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत अव्वल तीनमध्ये आहेत, असे वृत्त न्यूझीलंडमधील "स्टफ' या वर्तमानपत्राने दिले होते. त्यानंतर काही तासातच हेसन यांनी राजीनामा दिला आहे.

हेसन यांनी आपले पर्याय खुले ठेवले आहेत. भारतीय प्रशिक्षकांची निवड करणारी समिती भारतीय व्यक्तीस प्राधान्य देणार याची कुणकुण लागल्यावर त्यांनी पाकिस्तानच्या प्रमुख प्रशिक्षकपदासाठीही आपली दावेदारी सादर केली असल्याचे समजते.

हेसन यांनी याबाबत काहीही बोलणे सध्या तरी टाळले आहे. मात्र त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबर केलेला दोन वर्षांचा करार एक वर्ष होण्यापूर्वीच संपवला आहे. ब्रॅड हॉज यांच्याऐवजी किंग्ज इलेव्हन पंजाबने हेसन यांची निवड केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mike hesson interested in india as well as pakistan coach job