esakal | गवळ्याच्या मुलाने संपवला जगज्जेतेपदाचा दुष्काळ
sakal

बोलून बातमी शोधा

दीपक पुनिया
दूध विक्रेत्याचा मुलगा असलेल्या दीपक पुनियाने जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेतील भारताचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवला. आता वरिष्ठ जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याकडे त्याने लक्ष केंद्रित केले आहे.

गवळ्याच्या मुलाने संपवला जगज्जेतेपदाचा दुष्काळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई / नवी दिल्ली : दूध विक्रेत्याचा मुलगा असलेल्या दीपक पुनियाने जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेतील भारताचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवला. आता वरिष्ठ जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याकडे त्याने लक्ष केंद्रित केले आहे.

दीपकने एस्टोनियात झालेल्या स्पर्धेत फ्रीस्टाईल प्रकारात 86 किलो गटात बाजी मारली. झंझरच्या युवकाने निर्णायक लढतीत पिछाडीनंतर रशियाच्या ऍलिक शेवझुकोव याचा पराभव केला. जागतिक कुमार स्पर्धा जिंकण्याची ही अखेरची संधी होती, त्यामुळे जिंकण्यासाठी जास्त आतूर होतो, असे त्याने सांगितले. मी यापूर्वी वरिष्ठ गटात सुवर्णपदक जिंकले असले तरी ही स्पर्धा जास्त अवघड होती, असे त्याने सांगितले.

दरम्यान, आपण आपल्या मुलाचे यश लाईव्ह पाहू शकलो याचा आनंद दीपकच्या वडिलांना होता. त्याने 2016 मध्ये जागतिक कॅडेट स्पर्धा जिंकली, त्यावेळी दीपकचे वडील सुभाष यांच्याकडे स्मार्ट फोन नव्हता. पण या वेळी आपल्या मुलाला सुवर्णपदक स्वीकारताना पाहून त्यांची छाती भरून आली.

मला त्याचा अभिमान वाटतो. स्पर्धा सुरू झाल्यापासून त्याच्याशी बोललो नाही. त्याला आनंद किती झाला असेल हे सांगता येणार नाही. माझ्या मुलाने कुस्ती करावी, त्यासाठी पैसे असावेत, यासाठी मी घरोघरी जाऊन दूध देत असे. लहानपणी मीही कुस्ती करीत असे, पण गरिबीमुळे मला ही आवड जोपासता आली नव्हती. माझ्याबरोबरचे कुस्तीगीर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी गेले होते. त्यामुळे दीपकने यश मिळवावे अशी माझी इच्छा होती, असे त्यांनी सांगितले.

दीपक हा छत्रसालचा कुस्तीगीर आहे. सुशील कुमार, सत्पाल, मार्गदर्शक वीरेंदर त्याला जास्त खडतर लढतीसाठी नक्कीच तयार करतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

भारताचे चौथे कुमार सुवर्णपदक
दीपक पुनियाने जागतिक कुमार कुस्तीच्या इतिहासातील भारताचे चौथे सुवर्णपदक जिंकले. पण हे यश भारतास 18 वर्षांनंतर लाभले. यापूर्वी 2001 च्या स्पर्धेत रमेश गुलिया (69 किलो) आणि पलविंदर सिंग चीमा (130 किलो) यांनी ही कामगिरी केली होती. त्यापूर्वी पप्पू यादव 1992 च्या स्पर्धेत 50 किलो गटात विजेते ठरले होते.

loading image