esakal | मिशन ऑक्सिजन इंडिया; सचिन तेंडुलकरकडून 1 कोटींची मदत

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar

मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत असून गंभीर परिस्थितीत असलेल्या रुग्णाला ऑक्सिजन पुरवणे खूप मोठे आव्हान आपल्यासमोर आहे.

मिशन ऑक्सिजन इंडिया; सचिन तेंडुलकरकडून 1 कोटींची मदत
sakal_logo
By
सुशांत जाधव

विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) कोविड-19 च्या संकटात अडकलेल्या रुग्णांसाठी कोट्यवधींची आर्थिक मदत केली आहे. ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत त्याने 1 कोटी रुपये दान केले आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या संकटाच्या परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण पडला आहे. मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत असून गंभीर परिस्थितीत असलेल्या रुग्णाला ऑक्सिजन पुरवणे खूप मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. या कठिण परिस्थितीत अनेक लोक पुढे येऊन मदत करत आहेत, असे ट्विट सचिनने केले आहे.

देशात निर्माण झालेल्या कठिण परिस्थितीत अनेक लोक पुढे येऊन मदतीचा हात देत आहेत. 250 हून अधिक युवा व्यापाऱ्यांनी ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी निधी उभारण्याचे मिशन हाती घेतले आहे. मिशन ऑक्सिजन इंडियाच्या माध्यमातून सुरु केलेल्या उपक्रमात सहभागी झालो असून अन्य लोकांनी यात सहभागी व्हावे, असे सचिनने अधिकृत ट्विटवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 'मिशन ऑक्सिजन इंडिया' ने आपल्या निवेदनातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मदत केल्याची माहिती दिली असून सचिन तेंडुलकर मनापासून संकटात अडकलेल्या आपल्या देशवासिंयासाठी धावून आलाय.

हेही वाचा: भारतावरील संकटाने ब्रेट ली गहिवरला; बिटकॉईनच्या रुपात केली मोठी मदत

कमिन्स आणि ब्रेटली यांनी केली होती मदत

ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि दिग्गज ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेटली यांनी यापूर्वी मदत केली होती. पॅट कमिन्सने 37 लाख रुपये तर ब्रेटलीने 41 लाख रुपयांची मदत केली होती. खेळाडूंच्या या भूमिकेचे सर्वांनीच कौतूक केल्याचे पाहायला मिळाले.

दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सचाही मदतीचा हात

दिल्ली कॅपिटल्सने कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी दिल्लीतील लोकांसाठी दीड कोटी रुपयांची मदत केली होती. या रक्कमेचा वापर हा ऑक्सिजन सिलिंडर आणि कोविड किटसाठी करण्यात येणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाने देखील देशभरात सुरु असलेल्या कोरोनाच्या लढाईत आर्थिक हातभार लावण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी तब्बल 7.5 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केलीये.