कोरोना, तू हात धुवून मागे लागलाय का आमच्या? इंग्लंड क्रिकेट टीमला कोरोनाची घरघर

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 4 January 2021

इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली कोरोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे श्रीलंकेसोबतची मालिका सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली कोरोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे श्रीलंकेसोबतची मालिका सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेत पोहचल्यानंतर करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत  मोईन अली सकारात्मक आल्याची माहिती इंग्लंड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने दिली आहे. त्याशिवाय  मोईन अलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला दहा दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

इंग्लंडचा संघ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. त्यानंतर इंग्लंडच्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आणि या चाचणीत इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबतच क्रिस वोक्स देखील मोईन अलीच्या संपर्कात आल्यामुळे त्याला देखील पुढील दहा दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आल्याचे इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने आपल्या निवेदनात सांगितले आहे. 

इंग्लंडचा संघ मागील दौर्‍यावर श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे कसोटी न खेळताच माघारी परतला होता. त्यानंतर या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचे पुनर्नियोजन करण्यात आले होते. व इंग्लंडचा संघ नवीन वर्षात 3 जानेवारी रोजी श्रीलंकेत दाखल झाला होता. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गतच खेळवण्यात येणार आहे. 

दरम्यान, यापूर्वी इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून एकदिवसीय सामन्यांची मालिका न खेळताच माघारी परतला होता. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघातील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तर दोन्ही संघ ज्या ठिकाणी वास्तव्यास होते, तेथील दोन स्टाफच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते.        


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moeen Ali has tested positive for Corona on arrival in Sri Lanka