अफगाणिस्तानकडून शहजादचे काँट्रॅक्ट कॅन्सल

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑगस्ट 2019

अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने यष्टिरक्षक-फलंदाज महंमद शहजाद याचा करार बेमुदत काळासाठी रद्द केला आहे. त्याने आचारसंहितेचा भंग केल्याचे कारण देण्यात आले.

काबुल - अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने यष्टिरक्षक-फलंदाज महंमद शहजाद याचा करार बेमुदत काळासाठी रद्द केला आहे. त्याने आचारसंहितेचा भंग केल्याचे कारण देण्यात आले.

देशाबाहेर जाण्यापूर्वी मंडळाची परवानगी घेणे खेळाडूंना बंधनकारक आहे. या धोरणाचे त्याने पालन केले नाही. याशिवाय जुलैमधील 20 आणि 25 या दोन तारखांना शिस्तपालन समितीसमोर सुनावणीसाठी उपस्थित राहावे असे समन्स त्याला बजावण्यात आले होते. त्याकडेही त्याने दुर्लक्ष केले. आता ईदची सुट्टी झाल्यानंतर या समितीची बैठक होईल आणि पुढील कारवाईचा तपशील ठरेल.

शहजाद पेशावरमध्ये स्थायिक झाला आहे. त्याने अलिकडेच तेथे सराव केला. गेल्या वर्षी मंडळाने त्याला अफगाणिस्तानमध्ये कायमचे यावे असा आदेश दिला होता, अन्यथा करार रद्द होईल असे बजावले होते.

इंग्लंडमधील विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान शहजादची मायदेशी रवानगी करण्यात आली होती. त्यावेळी गुडघ्याच्या दुखापतीचे कारण देण्यात आले होते. स्वतः शहजादने मात्र आपण तंदुरुस्त असल्याचा व अयोग्य पद्धतीने वगळण्यात आल्याचा दावा केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohammad Shahzad suspended by ACB