महाराष्ट्राच्या मोरेने साकारला गुजरातचा विजय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

महाराष्ट्राचा जी. बी. मोरे गुजरातचा तारणहार ठरला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे गुजरात फॉर्च्युन जायंटस्‌ संघाने दबंग दिल्लीचा 31-26 असा पराभव करून प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात तिसरा विजय मिळवला.

मुंबई : महाराष्ट्राचा जी. बी. मोरे गुजरातचा तारणहार ठरला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे गुजरात फॉर्च्युन जायंटस्‌ संघाने दबंग दिल्लीचा 31-26 असा पराभव करून प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात तिसरा विजय मिळवला.

सलग दोन वर्षे उपविजेतेपद मिळवणारा गुजरातचा संघ अनुभवात उजवा आहे, परंतु दिल्लीने त्यांना झुंजवले. पिछाडीवरून बरोबरीनंतर आघाडी अशी दिल्लीने प्रगती केली, परंतु अखेरची सहा मिनिटे असताना त्यांना लोण स्वीकारावा लागला आणि 20-25 च्या पिछाडीनंतर त्यांना बाजी पलटवता आली नाही. जी. बी. मोरेने चढायांत पाच; तर पकडींमध्ये चार गुण मिळवले; तर दिल्लीकडून नवीन कुमारने सुपर टेनकरूनही गुजरातचीच सरशी ठरली.

सचिन तन्वर आणि रोहित गुलिया यांनी पहिल्या चढायांत बोनस गुण मिळवत गुजरातचे खाते उघडले. लगेचच दिल्लीच्या नवीन कुमारची डू ऑर डाय चढाईत पकड करून 3-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दिल्लीने कसाबसा पहिला गुण मिळवला, परंतु दुसरा गुण मिळवेपर्यंत आठ मिनिटांचा खेळ झाला होता. तोपर्यंत गुजरातने सहा गुणांची कमाई केली होती.

दिल्लीचा कोपरारक्षक चुका करत होता. याचा फायदा गुजरातच्या डी. बी. मोरेने दोनदा घेतला. 9-5 असा गुणफलक दिल्लीच्या बाजूने असताना नवीन कुमारने एकाच चढाईत दोन गुण मिळवले. त्यानंतर चंद्रन रणजितनेही अशीच कामगिरी केली, त्यामुळे मध्यांतराला गुजरातवर लोण देत दिल्लीने 14-11 अशी आघाडी घेतली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more shines in gujrat win