यॉर्करशी यारी, मलिंगाची बातच न्यारी

Lasith Malinga
Lasith Malinga
Updated on

भारतीय उपखंडातील क्रिकेट स्टार्सचे काही खरे नसते. त्यांच्या कामगिरीचे सतत पोस्टमार्टेम सुरु असते. त्यातच फॉर्मला ओहोटी लागली की मग काही विचारायचीच सोय नाही. त्यांच्या फिटनेसपासून मैदानाबाहेरील घडामोडींचे आणि इतकेच नव्हे तर खासगी आयुष्याचेही पोस्ट मार्टेम सुरु होते. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा यॉर्कर मास्टर लसित मलिंगा याची कथा आणखी निराळी.

वाढलेले पोट, घटलेल्या विकेट यावरून त्याला अवमानकारक टिकेला सामोरे जावे लागले. त्यातच त्याचे नेतृत्व आणि संघातील स्थान सुद्धा गेले. केवळ अनुभव आणि सक्षम दुसरा पर्याय नसल्यामुळे श्रीलंकन क्रिकेट त्याला नाकारू शकले नाही. याच मलिंगाने मुंबई इंडियन्सचे आयपीएल विजेतेपद साकारून आपला दर्जा अधोरेखित केला. भारतात आयपीएलमुळे मलिंगाचे असंख्य चाहते आहेत. तसे पाहिले तर जगभरात तो लोकप्रिय आहे. मलिंगाचे आयपीएल कनेक्शन श्रीलंकेतील पदाधिकाऱ्यांना मात्र कदापी पसंत पडलेले नाही.

याच मलिंगाने संघाचे आव्हान पणास लागले असताना वर्ल्ड कपचे व्यासपीठ दणाणून सोडले. त्याने इंग्लंडविरुद्ध 43 धावांत चार विकेट घेतल्या. सामनावीर पुरस्कार त्यानेच मिळविला. 233 धावांच्या माफक आव्हानासमोर इंग्लंडची स्पर्धेतील आधीची फलंदाजी पाहता श्रीलंकेचा पराभव अटळ वाटत होता. फलंदाजांनी धावांचे पुरेसे पाठबळ दिले नसेल तर तर गोलंदाजांचे काम अवघड होते. अशावेळी मलिंगाने आपला क्लास सिद्ध केला. त्याने स्ट्राईक बोलर म्हणून आपल्या जबाबदारीला न्याय दिला. दुसऱ्याच चेंडूवर त्याने जॉन बेअरस्टॉ याला बाद केले. दुसरा सलामीवीर जेम्स व्हिन्स याला त्याने सातव्या षटकात बाद केले. तुफान फॉर्मात असलेल्या ज्यो रूट याच्यासारखा जम बसलेला फलंदाजही त्याने माघारी धाडला. आणखी एक आक्रमक फलंदाज जॉस बटलर याच्या रुपाने त्याने चौथी विकेट मिळविली. मलिंगाने एक मेडन सुद्धा टाकली. विशेष म्हणजे ते डावातील तिसरे आणि वैयक्तिक दुसरे षटक होते. याद्वारे त्याने इतर गोलंदाजांचा उत्साह वाढविला.

ढेरपोट्या क्रिकेटपटूंचा संघ
2017 मध्ये क्रीडा मंत्र्यांवरील टीकेमुळे मलिंगाला एका वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. त्या मोसमात 13 वन-डे सामन्यांत 10 विकेट व 623 धावा इतकी निराशाजनक कामगिरी झाल्यामुळे त्याच्यावर टीका होत होती. इतर बहुतेक संघ फिटनेसच्या बाबतीत आघाडीवर असताना श्रीलंकेच्या संघात मात्र पोट सुटलेले खेळाडू असतात. असे ढेरपोटे खेळाडू केवळ श्रीलंका संघातच आहेत. त्यावरूनच क्रीडा मंत्री दयासिरी जयशेखरा यांनी टीका केली होती. त्यास प्रत्यूत्तर देताना मलिंगाने क्रीडा मंत्र्यांची तुलना माकडाशी केली होती. झाडाच्या ढोलीत अंडी घालणाऱ्या पोपटाविषयी माकडाला काय कळणार असे तो म्हणाला होता. त्यावरून चौकशी होऊन त्याला बंदीला सामोरे जावे लागले.

झटपट क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मलिंगने 2010 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यातच त्याला पाठदुखीने त्रस्त केले. त्यावर मात केली तरी त्याचे पोट मात्र काही कमी होत नव्हते. कामगिरीतील सातत्याअभावी त्याला कर्णधारपद गमवावे लागले. त्यावेळी तो वर्ल्ड कपसाठी संघातून माघार घेईल अशी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर मलिंगासाठी ही कामगिरी अभिमानास्पद आहे.

सासुच्या निधनामुळे मायदेशी जाऊन परतला
वर्ल्ड कपदरम्यान सासु कांती परेरा यांचे निधन झाल्यामुळे मलिंगा मायदेशी परत गेला होता. त्यानंतर तो परत आला. या कौटुंबिक पातळीवरील धक्यातूनही त्याने स्वतःला सावरले.

जयवर्धनेचा स्पेशल संदेश
मलिंगाच्या या कामगिरीवर सर्वांत बोलकी प्रतिक्रिया माजी कर्णधार माहेला जयवर्धने याने व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात सर्वाधिक चर्चा झालेला फोटो तुम्हा सर्वांसाठी शेअर करायचा विचार मनात आला आहे, असे त्याने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.
Form is Temporary, Class is Permanent अशी उक्ती क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे.

मलिगांच्या बाबतीत त्यापुढे Fitness is Secondary असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरू नये. अर्थात त्यासाठी एखाद्याला त्याच्याप्रमाणे यॉर्कर मनात येईल तेव्हा टाकण्याची मास्टरी कमवावी लागेल. यॉर्करशी याराना निर्माण करावा लागेल. या-सम-हाच अशा मलिंगासाठी जोरदार टाळ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com