साडेतीनशे धावा करणाऱ्या मुंबईचा गोव्यावर विजय

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

यशस्वी जैसवालचे शतक आणि त्यानंतर इतर नावाजलेल्या फलंदाजांनी दिलेले योगदान यामुळे साडेतीनशे धावांचा डोंगर उभा करणाऱ्या मुंबईने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुबळ्या गोव्याचा 131 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेतले आव्हान कायम ठेवले.

बंगळूर : यशस्वी जैसवालचे शतक आणि त्यानंतर इतर नावाजलेल्या फलंदाजांनी दिलेले योगदान यामुळे साडेतीनशे धावांचा डोंगर उभा करणाऱ्या मुंबईने विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुबळ्या गोव्याचा 131 धावांनी पराभव केला आणि स्पर्धेतले आव्हान कायम ठेवले.

काही दिवसांपूर्वी छत्तीसगडविरुद्ध तीनशे धावा करूनही मुंबईला एका धावेने हार स्वीकारावी लागली होता. या वेळी मात्र गोलंदाजांनीही अचूकता दाखवली; त्यामुळे 362 धावा केल्यानंतर मुंबईने गोव्याला 232 धावांत गुंडाळले. शार्दुल ठाकूरने दोन, तर शम्स मुलालीने तीन विकेट मिळवल्या. इतर गोलंदाजांनीही एकेका विकेटचे योगदान दिले.

श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड अशी मुंबईकडे ताकदवर फलंदाजी आहे, पण त्यांच्यासाठी यशस्वी जैसवाल आणि आदित्य तरे यांनी दीडशतकी सलामी देऊन भक्कम पायाभरणी केली. जैसवालने सहा चौकार आणि पाच षटकारांसह 113 धावा झळकावल्या; तर तरेने 93 चेंडूंत 86 धावा उभारल्या.
भारत अ संघातून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या सिद्धेश लाडला या सामन्यात तिसरा क्रमांक देण्यात आला; पण त्याला 34 धावा करता आल्या. परंतु, तोपर्यंत मोठ्या धावसंखेकडे मुंबईने वाटचाल केली होती. कर्णधार श्रेयस अय्यरचे अर्धशतक तीन धावांनी दूर राहिले. तो बाद झाला, तेव्हा अखेरच्या 22 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला होता. पण सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी या 22 चेंडूंत 52 धावांचा तडाखा दिला.

आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेला एकही फलंदाज नसलेल्या गोव्यासाठी साडेतीनशे धावांचे आव्हान फारच मोठे होते. तरीही त्यांच्या काही प्रमुख खेळाडूंनी लढा दिला. पण इतरांची साथ मिळाली नाही; त्यामुळे त्यांचे आव्हान शतकी धावांनी तोकडे पडले. आदित्य कौशिक या सलामीवीराने 43 धावा केल्या. संगम कामदने 32; तर स्नेहल कौठणकरने अर्धशतकी खेळी केली. तोपर्यंत गोव्याने 2 बाद 115 पर्यंत मजल मारली होती. मात्र, त्यानंतर मुंबई गोलंदाजांनी पकड घट्ट करत विजय निश्‍चित केला.

संक्षिप्त धावफलक - मुंबई ः 50 षटकांत 4 बाद 362 (यशस्वी जैसवाल 113 -123 चेंडू, 6 चौकार, 5 षटकार, आदित्य तरे 86 -93 चेंडू, 11 चौकार, 2 षटकार, सिद्धेश लाड 34 -23 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, श्रेयस अय्यर 47 -29 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार, सूर्यकुमार यादव नाबाद 34 -21 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, शिवम दुबे नाबाद 33 -13 चेंडू, 1 चौकार, 4 षटकार, अमित वर्मा 10-0-65-2) वि. वि. गोवा ः 48.1 षटकांत सर्वबाद 232 (आदित्य कौशिक 43 - 46 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार, संगम कामत 32 -60 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, स्नेहल कौठणकर 50 -72 चेंडू, 4 चौकार, शार्दुल ठाकूर 7.1-0-33-2, शम्स मुलानी 10-1-38-3, यशस्वी जैसवाल 2-0-14-1)

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai beat goa in hazare trophy