IPL 2019 : पोलार्डने बदडले; जोसेफने लोळविले 

Mumbai Indians
Mumbai Indians

हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादला आयपीएलच्या 12व्या पर्वात शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागला. 137 धावांचे आवाक्‍यातील आव्हान असूनही हैदराबादला 40 धावांनी शरणागती पत्करावी लागली. त्यांना शतकी पल्लाही गाठता आला नाही. मुंबईने याबरोबरच पाच सामन्यांत तिसरा विजय मिळवित चौथे स्थान गाठले. सनरायझर्सचा दुसरा क्रमांक कायम राहिला. 

वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डचे फलंदाजीत प्रतिआक्रमण, तर त्याचा देशबांधव अल्झारी जोसेफचे गोलंदाजीतील आक्रमण मुंबईसाठी दणदणीत फळ देणारे ठरले. यातही एक डझन धावा देत अर्धा डझन विकेट पटकावलेला वेगवान गोलंदाज जोसेफ सनसनाटी ठरला. ऍडम मिल्नेला दुखापत झाल्यामुळे मुंबईने त्याला पाचरण केले आहे. 

वॉर्नर-बेअरस्टॉ यांनी 33 धावांची सलामी दिली. त्याच धावसंख्येवर बेअरस्टॉला चहरने बाद केले. जोसेफने पहिल्याच चेंडूवर वॉर्नरचा त्रिफळा उडविला. त्यानंतर हैदराबादची घसरगुंडी सुरु झाली. जोपेशने शंकर, हुडा, रशीद, भुवनेश्वर व कौल असे आणखी पाच व एकूण सहा मोहरे गारद केले. तत्पूर्वी, मुंबईने पोलार्डच्या प्रतिआक्रमणामुळे 7 बाद 136 अशी मजल मारली. शेवटच्या दोन षटकांत मुंबईने 39 धावा झोडपल्या, त्या पोलार्डमुळेच. 

18 षटके संपली तेव्हा मुंबईचे शतकही फलकावर लागले नव्हते. अशा वेळी पोलार्डने सिद्धार्थ कौलवर तोफ डागली. पहिल्या चेंडूवर स्लोअर वन असूनही त्याने षटकार ठोकला. दुसऱ्या चेंडूला यॉर्करवर तो चकला, पण तिसरा चेंडू गुडघ्यापर्यंत फुलटॉस येताच पोलार्डने फ्लीकचा षटकार डीप मिडविकेटला मारला. मग नोबॉल पडला. चौथ्या चेंडूवर षटकार मारल्यावर पाचव्या चेंडूवर पोलार्ड चकला. मग त्याने एक धाव घेत स्ट्राईक राखली. या षटकात 20 धावा गेल्या. 

अखेरच्या षटकात पोलार्डने भुवनेश्वरकडून 19 धावा वसूल केल्या. यात दोन चौकार व एका षटकाराचा समावेश होता. भुवनेश्वरने सुरवातच वाईडने केली होती. 

संक्षिप्त धावफलक :
मुंबई इंडियन्स ः 20 षटकांत 7 बाद 136 (रोहित शर्मा 11-14 चेंडू, 1 षटकार, क्विंटन डीकॉक 19-18 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, सूर्यकुमार यादव 7-8 चेंडू, 1 चौकार, इशान किशन 17-21 चेंडू, 2 चौकार, कृणाल पंड्या 6, कायरन पोलार्ड 46-26 चेंडू, 2 चौकार, 4 षटकार, हार्दीक पंड्या 14-14 चेंडू, 1 षटकार, राहुल चहर 10-7 चेंडू, 2 चौकार, भुवनेश्वर 4-0-34-1, संदीप शर्मा 3-0-20-1, महंमद नबी 4-0-13-1, सिद्धार्थ कौल 4-0-34-2, रशीद खान 4-0-27-1) विजयी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ः 17.4 षटकांत सर्वबाद 96 (डेव्हीड वॉर्नर 15-13 चेंडू, 2 चौकार, जॉनी बेअरस्टॉ 16-10 चेंडू, 3 चौकार, विजय शंकर 5-10 चेंडू, 1 चौकार, मनिष पांडे 16-21 चेंडू, दिपक हुडा 20-24 चेंडू, 1 चौकार, युसूफ पठाण 0-4 चेंडू, महंमद नबी 11, रशीद खान 0, भुवनेश्वर 2, सिद्धार्थ कौल 0, संदीप शर्मा नाबाद 5, जॅसन बेहरनडॉर्फ 4-0-28-1, बुमरा 3-0-16-1, राहुल चहर 4-0-21-2, अल्झारी जोसेफ 3.4-1-12-6, कृणाल पंड्या 2-0-9-0)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com