
State Kabaddi Championship: मुंबई शहर पूर्व व पश्र्चिम, मुंबई उपनगर पश्चिम यांची महिला विभागात, तर रायगड, नाशिक शहर, ठाणे ग्रामीण यांची पुरुष विभागांत राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत बाद फेरीच्या दिशेने घोडदौड केली.
महिलांच्या ग गटात मुंबई शहर पश्र्चिमने ठाणे शहरचा ४०-२२ असा पाडाव करीत बाद फेरीचा आपला मार्ग मोकळा केला. आक्रमक सुरुवात करीत मुंबईने पूर्वार्धात दोन लोण देत २७-१४ अशी आश्वासक आघाडी घेतली. उत्तरार्धात त्याच जोशाने खेळत आपला विजय सोपा केला. श्रद्धा कदमने एकाच चढाईत चार गडी टिपत या विजयात महत्त्वाचा खेळ केला. तिला पूजा यादवची चढाईत, तर पौर्णिमा जेधेची उत्कृष्ट साथ लाभली. ठाण्याची माधुरी गवंडी एकाकी लढली.