
ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवायचंय राष्ट्रीय कुस्तीपटू पल्लवी खेडकरची भावना
अहमदनगर : राष्ट्रीय कुस्तीपटू पल्लवी खेडकर मैदानात प्रतिस्पर्ध्यासोबत दोन हात करीत आहे. मात्र, दुसरीकडे परिस्थितीशी तिला लढावे लागत आहे. या दोन्ही लढाया ती नेटाने लढत आहे. मात्र, दुसरी लढाई तिच्यासाठी मोठी जिकिरीची आहे. दात्यांच्या पाठबळामुळे तिने अनेक मैदाने मारलीत. दैनिक सकाळने तिच्या संघर्षाची कहाणी प्रसिद्ध केल्यानंतर तिच्यासाठी मदतीसाठी अनेक हात सरसावले. ही आर्थिक आणि मानसिक मदत लढण्यास प्रेरणा देईल. ती ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देण्यासाठी बळ देत राहील, अशी भावना तिने व्यक्त केली. पल्लवी हिने आई मीरा यांच्यासोबत आज दैनिक सकाळच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. खेळाची आणि संघर्षाची दखल घेतल्याने तिच्या पालकांनी ‘सकाळ’ला धन्यवाद दिले. आवृत्ती प्रमुख प्रकाश पाटील यांनी तिचे स्वागत केले. त्यावेळी तिने आपला संघर्ष उलगडला.
ती म्हणाली, की मला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. सुरवातीला शाळेत कबड्डी खेळायचे. त्यामुळे मी सराव करायचे. परंतु कबड्डी हा सांघिक खेळ असल्याने मोक्याच्या क्षणी काही जणींमुळे हार पत्करावी लागायची. त्यामुळे मी निराश झाले. परंतु काही प्रशिक्षकांनी वैयक्तिक क्रीडा प्रकाराकडे वळण्याचा सल्ला दिला. माझ्यापुढे ॲथलेटिक्स आणि कुस्ती हे दोन पर्याय होते. त्यात कुस्ती हा मला जवळचा वाटला. त्यामुळे मी या पुरुषी क्षेत्राची मक्तेदारी असलेल्या क्रीडाप्रकाराकडे वळले.
खेड्यात मुलींनी कुस्ती खेळणे म्हणजे अतीच समजलं जाई. परंतु माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. काहीजणांनी हे काय भलतंच म्हणून विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु वडिलांचा निर्धार पक्का असल्याने त्यांनी मला नाउमेद होऊ दिलं नाही. त्यांच्यासोबत आईही नावे ठेवणाऱ्यांना सुनावले. घरातील सर्वांचा पाठिंबा असल्याने मला लढण्यास बळ मिळाले. ‘सकाळ’सारख्या माध्यमसमूहाने माझी दखल घेत पाठीवर थाप दिली. हे एखाद्या राष्ट्रीय पुरस्कारापेक्षाही कमी नाही, असेही पल्लवीने सांगितले.आपल्याकडे जपान, चीनपेक्षा खूप कमी सुविधा आहेत. कुस्ती आता वेगवान झाली आहे. त्यासाठी शरीर काटक ठेवावे लागते. डाएट आणि व्यायाम या दोन गोष्टींवर कुस्तीपटूला भर द्यावा लागतो. त्यासाठी सकाळी चार वाजताच दिवस सुरू होतो. व्यायाम केल्यानंतर अभ्यासातही लक्ष देते. दुपारी विश्रांतीनंतर सायंकाळी व्यायाम असा दिनक्रम असतो.
आतापर्यंतची सुवर्ण कामगिरी
पल्लवीने राष्ट्रीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे. मध्य प्रदेशात झालेल्या फेडरेशनच्या स्पर्धेत सुवर्ण पटकावलेय. इतर स्पर्धांमध्येही तिने सुवर्ण कामगिरी केली आहे. ती ६८ किलो वजनगटात खेळते. देशासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे तिचे स्वप्न आहे.
वडील ऊसतोड कामगार
पल्लवी ही पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड कामगाराची मुलगी आहे. सध्या ती राजूर येथील देशमुख महाविद्यालयात शिक्षण घेते. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख, कोल्हापूरचे संदीप पाटील, ‘साई’चे तान्हाजी नरके, क्रीडा संचालक शरद नवले यांचे तिला सहकार्य आहे. तिला महिन्याला खुराकाला २० हजार रुपये लागतात. वडील रामभाऊ खेडकर पोटाला चिमटा घेऊन कुस्तीसाठीचा खर्च उचलीत आहेत. त्यांचा संघर्ष पाहून परिसरातील लोकही त्यांना मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कोणाकडून प्रायोजकत्व मिळाल्यास वडिलांचा संघर्ष थांबेल, अशी पल्लवीची भावना आहे.
Web Title: National Wrestler Pallavi Khedkar Desire Win Medal In Olympics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..