13 वर्षांनी केन-साउदी-बोल्टनं केली 'विराट' पराभवाची परतफेड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs NZ

13 वर्षांनी केन-साउदी-बोल्टनं केली 'विराट' पराभवाची परतफेड

न्यूझीलंडच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) टीम इंडियाला 8 गडी राखून पराभूत केले. पहिल्या आणि दुसऱ्या डावात विराट कोहलीची विकेट घेणाऱ्या कायले जेमिन्सनसला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पहिल्या डावात त्याने पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. पाऊस आणि अंधूक प्रकाशाच्या खेळानंतर सामना राखीव दिवसावर गेला. अखेरच्या आणि सहाव्या दिवशी न्यूझीलंडने टीम इंडियाचा दुसरा डाव 170 आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडला जवळपास 53 षटकात 139 धावांचे लक्ष्य मिळाले होते. (new-zealand-captain-kane-williamson-hug-of-indian-captain-virat-kohli-after-world-test-championship-final)

कर्णधार केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नाबाद 52 धावा आणि अनुभवी रॉस टेलरच्या 47 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने दोन गड्यांच्या मोबदल्यात टीम इंडियाने दिलेले लक्ष्य पार केले. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या वहिल्या ट्रॉफीवर न्यूझीलंडने आपले नाव कोरले. टीम इंडियाला या सामन्या पराभवाचा सामना करावा लागला असला तरी कोहली-विल्यमसन यांच्यातील सामन्यानंतरच्या जादूची झप्पीनं क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारावून सोडले आहे.

हेही वाचा: WTC : मानाच्या गदेसह ICC टेस्ट चॅम्पियन्सची गादी न्यूझीलंडचीच!

न्यूझीलंडने सामना जिंकताच कोहलीने केन विल्यमसनचे अभिनंदन केले. वर्ल्ड चॅम्पियन टेस्ट कॅप्टनच्या गळ्यात पडून किंग कोहलीने त्याला शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर या दोघांच्या गळाभेटीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. दोन्ही कर्णधारांच्यातील सामन्यानंतरचा क्षण चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये कोहलीने न्यूझीलंडच्या संघावर कौतुकाचा वर्षाव केला. न्यूझीलंडचा संघ विजयाचा हक्कदार असल्याचे त्याने सांगितले. दुसऱ्या डावात आम्ही 30 ते 40 धावा अधिक केल्या असत्या तर सामन्याचा निकाल वेगळा असता, असेही विराट कोहली यावेळी म्हणाला. केन विल्यमसनने ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीचे आभार मानताना पाहायला मिळाले. टीम इंडिया अविश्वसनीय आहे. त्यांच्याविरुद्धची लढत संघर्षमय असेल, याची आम्हाला कल्पना होती. आम्ही सामना जिंकण्यात यशस्वी ठरलो, याचा आनंद वाटतो, अशी भावना केन विल्यमसनने व्यक्त केली.

हेही वाचा: गंभीर दुखापतीनंतर शेवटपर्यंत विकेटमागे थांबण्याचं धाडस!

केन विल्यमसन आणि विराट कोहली समोरासमोर भिडण्याची ही पहिली वेळ नव्हती. 2008 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि केन विल्यमसन यांच्यात फायनल सामना रंगला होता. यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने बाजी मारली होती. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली ट्रेंट बोल्ट, साउदी आणि कोरी अँड्रसन यांचा समावेश होता. खेळाच्या भाषेत सांगायचे तर 13 वर्षानंतर साउदी आणि ट्रेंट बोल्ट यांच्यासह खेळताना केन विल्यमसनने विराट कोहलीने दिलेल्या पराभवाची परतफेड केलीये. बऱ्याच जणांच्या ही गोष्ट कदाचित लक्षातही नसेल. आक्रमक विराट आणि संयमी केन या दोघांच्या स्वभावात दोन टोकाचे बिंदू दिसत असले तरी दशकाहून अधिक काळापासून त्यांच्यात एक अनोख्या मैत्रीचा धागा बनला आहे, हे देखील तितकेच खरे.

Web Title: New Zealand Captain Kane Williamson Hug Of Indian Captain Virat Kohli After World Test Championship

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..