विल्यम्सन चार वर्षांत प्रथमच शून्यावर बाद; किवींच्या 203 धावा

वृत्तसंस्था
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

ऑफ स्पिनर अकिला धनंजय याने न्यूझीलंडच्या फलंदाजांची कसोटी घेत पहिल्या दिवशी श्रीलंकेचे वर्चस्व राखण्यात मोलाचा वाटा उचलला. पण, त्याचवेळी रॉस टेलरने संयमी खेळी करून न्यूझीलंडचेही आव्हान राखण्याचा प्रयत्न केला. अर्थात, दिवस अखेरीस दोघांच्या प्रयत्नांवर पावसाने पाणी फेरले. 

गॉल : ऑफ स्पिनर अकिला धनंजय याने न्यूझीलंडच्या फलंदाजांची कसोटी घेत पहिल्या दिवशी श्रीलंकेचे वर्चस्व राखण्यात मोलाचा वाटा उचलला. पण, त्याचवेळी रॉस टेलरने संयमी खेळी करून न्यूझीलंडचेही आव्हान राखण्याचा प्रयत्न केला. अर्थात, दिवस अखेरीस दोघांच्या प्रयत्नांवर पावसाने पाणी फेरले. 

पहिल्या दिवशी पावसामुळे 68 षटकांचाच खेळ झाला. खेळ थांबविण्यात आला तेव्हा न्यूझीलंडने 5 बाद 203 धावा केल्या होत्या. त्या वेळी रॉस टेलर 88, तर मिशेल सॅंटनेर 8 धावांवर खेळत होता. न्यूझीलंडचे पाचही बळी अकिला धनंजय याने टिपले. 

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची सुरवात संयम होती. जीत रावल आणि टॉम लॅथम यांना 64 धावांची सलामी दिली. पण, त्यानंतर अकिलाची गोलंदाजी सुरू झाल्यावर न्यूझीलंडचा डाव पहिल्या सत्रातच 3 बाद 71 असा कोलमडला. सलामीची जोडी फोडल्यावर अकिलाने न्यूझीलंड कर्णधार केन विल्यम्सनला भोपळाही फोडू दिला नाही.

त्यानंतर मात्र, भरवशाच्या रॉस टेलरने लौकिकाला साजेसा खेळ केला. हेन्‍री निकोल्सला साथीला घेत त्याने शतकी भागीदारी करताना न्यूझीलंडचा डाव सावरला. पण, अखेरच्या सत्रातील पंधरा मिनिटांच्या खेळात अकिलाने पुन्हा एकदा न्यूझीलंडला धक्का देताना निकोल्स आणि बीजे वॉल्टिंग यांना पायचित करून श्रीलंकेचे वर्चस्व पुन्हा निर्माण केले. त्या वेळी पावसाने लावलेल्या हजेरीनंतर अखेरच्या सत्रातील खेळ पुन्हा सुरूच होऊ शकला नाही. 

अकिलाची फिरकी आणि मधल्या सत्रात रॉस टेलर आणि निकोल्स यांनी फिरकी खेळण्याचे दाखवलेले कसब आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. टेलर आणि निकोल्स यांची फलंदाजी सुरू असताना श्रीलंकेचे गोलंदाज हतबल ठरत होते. अकिला देखील पहिल्या सत्रात दाखवलेली विविधता दुसऱ्या सात्रत दाखवू शकला नव्हता. फिरकीवर कुरघोडी करताना पुढे येऊन खेळण्याचा टेलरचा जुगार चांगलाच यशस्वी ठरला. अनेकदा तो नशीबवान ठरला. चेंडू कधी त्याच्या बॅटची कड घेऊन, तर कधी बॅट अँड पॅड मधून जात होते. पण, आक्रमकता हाच उत्तम बचाव हे त्याचे नियोजन न्यूझीलंडच्या पथ्यावर पडले. 

संक्षिप्त धावफलक 
न्यूझीलंड 68 षटकांत 5 बाद 203 (रॉस टेलर खेळत आहे 82, हेन्‍री निकोल्स 42, टॉम लॅथम 30, जीत रावल 33, अकिला धनंजय 22-2-57-5)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Zealand scores 203 runs in test against SriLanka