esakal | निशिकोरीकडून मरे गारद
sakal

बोलून बातमी शोधा

Andy Murray

सविस्तर निकाल (उपांत्यपूर्व)

महिला एकेरी - कॅरोलिना प्लिस्कोवा (चेक १०) वि.वि. ॲना काँजुह (क्रोएशिया) ६-२, ६-२. सेरेना विल्यम्स (अमेरिका १) विवि सिमोना हालेप (रुमानिया ५) ६-२, ४-६, ६-३. पुरुष एकेरी ः केई निशिकोरी (जपान ६) विवि अँडी मरे (ब्रिटन २) १-६, ६-४, ४-६, ६-१, ७-५. स्टॅन वॉव्रींका (स्वित्झर्लंड ३) वि.वि. जुआन मार्टिन डेल पोट्रो (अर्जेंटिना) ७-६ (७-५), ४-६, ६-३, ६-२.

निशिकोरीकडून मरे गारद

sakal_logo
By
वृत्तसंस्था

न्यूयॉर्क - जपानच्या केई निशिकोरीने संभाव्य विजेत्या अँडी मरेला पाच सेटमध्ये हरवून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. निर्णायक पाचव्या सेटमध्ये निशिकोरीने एकाग्रता अढळ राखली. विंबल्डन आणि रिओ ऑलिंपिक विजेत्या मरेचा सुमारे चार तास चाललेल्या लढतीमधील पराभव अनपेक्षित ठरला. सेरेना विल्यम्सने रुमानियाच्या सिमोना हालेपचे कडवे आव्हान मोडून काढत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

निशिकोरीने सांगितले, ‘‘प्रत्यक्ष कोर्टवर मी फार रोमांचित झालो होतो, पण मी शांत राहण्याचा प्रयत्न केला. तसे करणे फार अवघड होते.’’ निशिकोरीने कारकिर्दीत दुसऱ्यांदाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. याच स्पर्धेत त्याने २०१४ मध्ये उपविजेतेपदापर्यंत मजल मारली होती.

निशिकोरीने कारकिर्दीत नऊ लढतींमध्ये दुसऱ्यांदाच मरेला हरविले. या लढतीत १७ सर्व्हिसब्रेकची नोंद झाली. मरेने सेटमध्ये २-१ अशी आघाडी घेतली होती. चौथ्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये त्याने एक ब्रेकपॉइंट मिळविला होता. त्याच वेळी आर्थर ॲश स्टेडियमवरील लाउडस्पीकर बिघडून त्यातून मोठा आवाज आला. पावसामुळे छप्पर बंद होते. त्यामुळे हा आवाज घुमला. त्यामुळे पंच मारिया सिसॅक यांनी गुण पुन्हा खेळण्याचा निर्णय दिला. त्यामुळे मरेची चिडचिड झाली. त्याची एकाग्रता ढळली. तेथून त्याने सलग पाच गेम गमावले. दुसरीकडे निशिकोरीने चपळ हालचाली करीत प्रतिआक्रमण रचले.

डेल पोट्रोवर वॉव्रींकाची मात

स्टॅन वॉव्रींकाने जुआन मार्टिन डेल पोट्रोला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. डेल पोट्रोला मनगटाच्या दुखापतीमुळे सलग नऊ ग्रॅंड स्लॅम स्पर्धांना मुकावे लागले होते. विंबल्डनमध्ये त्याने पुनरागमन केले. त्याने दुसऱ्या फेरीत वॉव्रींकाला गारद केले होते. त्यानंतर त्याने रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक मिळविले होते. त्याने दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली होती, पण वॉव्रींकाने विंबल्डनमधील पराभवाची परतफेड केली.

सेरेना-कॅरोलिना लढत

महिला एकेरीत सेरेना विल्यम्स आणि कॅरोलिना प्लिस्कोवा यांच्यात उपांत्य सामना होईल. सेरेनाने सिमोना हालेपवर तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण विजय मिळविला, तर कॅरोलिनाने क्रोएशियाच्या ॲना काँजुह हिची घोडदौड दोन सेटमध्ये रोखली. सेरेनाची सर्व्हिस यंदाच्या स्पर्धेत प्रथमच खंडित झाली. तिने एकूण दोन वेळा सर्व्हिस गमावली. स्पर्धेत तिने प्रथमच सेट गमावला. अखेरीस तिने नेहमीच्या जिद्दीने खेळ करीत विजय खेचून आणला.कॅरोलिनाने चौथ्या फेरीत व्हीनस विल्यम्सला हरविताना एक मॅचपॉइंट वाचविला होता. तिने ॲनाविरुद्ध ५७ मिनिटांत विजय मिळविला.