esakal | हॉकी महासंघाला क्रीडामंत्र्यांनी फटकारले
sakal

बोलून बातमी शोधा

anurag thakur

हॉकी महासंघाला क्रीडामंत्र्यांनी फटकारले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्याबद्दल क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतीय हॉकी महासंघाचे कान टोचले आहेत. राष्ट्रीय हॉकी महासंघाने असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सरकारशी सल्लामसलत केली पाहिजे, असेही मत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

‘ऑलिंपिकसारख्या स्पर्धेच्या तयारीसाठी भारत सरकारकडून निधी दिला जातो. त्‍यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाच्या राष्ट्रीय संघाच्या प्रतिनिधित्वाबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे. कुठल्याही महासंघाने असे वक्तव्य टाळतानाच प्रथम सरकारशी चर्चा केली पाहिजे. कारण तो देशाचा राष्ट्रीय संघ आहे, केवळ महासंघाचा संघ नाही,’ असे पत्रकारांशी बोलताना ठाकूर यांनी म्हटले आहे.

ठाकूर पुढे म्हणाले, ‘१३० कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात फक्त १८ खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. ही (राष्ट्रकुल स्पर्धा) एक जागतिक स्पर्धा आहे आणि त्यांनी (हॉकी महासंघाने) सरकार आणि संबंधित विभागाशी याबाबतीत चर्चा करायला हवी होती. त्यानंतर सरकारने निर्णय घेतला असता.’

भारतीय हॉकी महासंघाने ब्रिटनमधील कोरोना निर्बंधांचे कारण देत पुढील वर्षीच्या बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय मंगळवारी घेतल्यानंतर ठाकूर यांनी हे खडे बोल सुनावले आहेत.

हॉकी महासंघाने हा निर्णय घेताना असेही म्हटले होते की, ‘बर्मिंघम स्पर्धा (२८ जुलै ते ८ ऑगस्ट) आणि ‘हांग्जो’ आशियाई स्पर्धा (१० ते २५ सप्टेंबर) दरम्यान केवळ ३२ दिवसांचे अंतर आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यास, भारत २०२४ मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिकसाठी थेट पात्र ठरणार असल्याने राष्ट्रकुल स्पर्धेऐवजी आशियाई स्पर्धेला प्राधान्य देत आहोत.’

loading image
go to top