ऑस्ट्रेलियाच्या ऑलीचे सहा चेंडूंवर सहा षटकार

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याची प्रतीक्षा असतानाच ऍडलेड येथे सोमवारी 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये ऑली डेव्हिएस याने सहा चेंडूंवर सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला. 

अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याची प्रतीक्षा असतानाच ऍडलेड येथे सोमवारी 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये ऑली डेव्हिएस याने सहा चेंडूंवर सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला. 

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या 19 वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत ऑली न्यू साऊथ वेल्स मेट्रो संघाचे नेतृत्व करतो. त्याने 115 चेंडूंत 207 धावांची खेळी केली. या खेळीतच त्याने सलग सहा षटकार टोकले. संघाच्या 4 बाद 406 धावांत त्याचा वाटा 207 धावांचा होता. 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियातील हे दुसरेच द्विशतक झळकले. यापूर्वी 2001-02 मध्ये जेसन क्रेझा याने झळकाविले होते. 

ऑलीने डावातील 40व्या षटकांत ही कामगिरी केली. त्याने आपले दुसरे शतक केवळ 39 धावांत झळकाविले. या कामगिरीविषयी ऑली म्हणाला, ""फटकाविण्यासाठी मी चांगल्या चेंडूची वाट बघत होतो. पहिल्या दोन षटकारांनंतर माझ्या डोक्‍यात सहाही चेंडूंवर षटकार ठोकण्याचा विचार डोकावला आणि तो करून दाखवला.'' ऑलीचे सहाही षटकार हे ऑनला होते. 

या सामन्यात 18 वर्षीय ऑलीने 17 षटकार लगावले. त्याने आपले पहिले शतक 74 चेंडूंत, तर दुसरे शतक अवघ्या 39 चेंडूंत केले. न्यू साऊथ वेल्सने हा सामना 168 धावांनी जिंकला. प्रतिस्पर्धी नॉर्दर्न टेरिटरी संघाचा डाव अखेरच्या षटकांत 238 धावांत आटोपला. 

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक 16 षटकार लगाविण्याचा विक्रम रोहित शर्मा, एबी डिव्हिलर्स, ख्रिस गेल यांच्या नावावर आहे, तर गॅरी सोबर्स, हर्शेल गिब्ज आणि युवराज सिंग यांनी सलग सहा चेंडूंवर सहा षटकार लगावले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ollie davies hits 6 sixes in an over