esakal | कोल्हापूरकरांचा निशाना अचूकच ; ऑलिंपिकच्या संभाव्य संघात पाच नेमबाजांचा समावेश  

बोलून बातमी शोधा

The Olympic team includes five Kolhapur shooters

टोकिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या नेमबाजीच्या संभाव्य संघाची घोषणाही झाली.

कोल्हापूरकरांचा निशाना अचूकच ; ऑलिंपिकच्या संभाव्य संघात पाच नेमबाजांचा समावेश  
sakal_logo
By
सुयोग घाटगे

कोल्हापूर : ऑलिम्पिक स्पर्धांचे नियोजन एक वर्षाने पुढे गेल्याने अनेक स्पर्धकांना तयारीसाठी जादा वेळ मिळाला आहे; तर अनेक नवीन स्पर्धकांना संधी उपलब्ध झाली. कोल्हापूरच्या स्पर्धकांनी नेमबाजीत आपले स्थान निश्‍चित केले आहे. या ऑलिम्पिकसाठी कोल्हापूरच्या तब्बल पाच जणांनी ऑलिम्पिक संभाव्य संघात आपली स्थान निश्‍चिती केली. कष्ट, जिद्द व चिकाटीच्या जोरावर सुवर्ण कामगिरीचे प्रयत्न सुरू केले आहेत. 


टोकिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या नेमबाजीच्या संभाव्य संघाची घोषणाही झाली. येत्या काही दिवसांत दिल्ली येथे सराव सत्राला सुरवात होऊन यातून अंतिम संघ निवडण्यात येणार आहे. या संभाव्य संघात कोल्हापूरच्या पाच नेमबाजांनी आपले स्थान बळकट केले. यात तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, स्वप्नील कुसाळे, स्वरूप उन्हाळकर आणि अभिज्ञा पाटील यांचा समावेश आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रभाव प्रत्येक घटकावर परिणाम करीत असताना कोल्हापूरच्या या नेमबाजांनी आपल्या कामगिरीतील सातत्याच्या जोरावर मिळविलेले हे स्थान कौतुकास्पद आहे. 


नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने टोकिओ ऑलिम्पिकसाठी 34 जणांच्या संभाव्य संघाची घोषणा केली. देशभरातील नेमबाजांतील सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या आणि सर्वाधिक गुण पटकावत अग्रक्रमांकावर असणाऱ्या नेमबाजांचा यात समावेश केला आहे. यात 50 मीटर रायफल पुरुष गटात स्वप्नील कुसाळे, महिला गटात तेजस्विनी सावंत, 25 मीटर पिस्तूल प्रकारात राही सरनोबत आणि अभिज्ञा पाटील यांचा समावेश आहे; तर पॅरा प्रकारात 10 मीटर रायफलसाठी स्वरूप उन्हाळकर पात्र आहे. देशभरातून निवडण्यात आलेल्या या नेमबाजांमध्ये कोल्हापूरच्या सर्वाधिक नेमबाजांचा समावेश आहे. यामुळे देशाच्या ऑलिम्पिक पदकतालिकेत कोल्हापूरच्या खेळाडूंची नावे असतील, हे निश्‍चित. 

हे पण वाचासैन्यदलात अधिकारीच होण्याची स्वप्ने मराठा तरुणांनी पहायला हवीत 


कोरोनामुळे सर्वच नेमबाज सध्या छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडासंकुल येथील शूटिंग रेंजमध्ये आणि स्वतःच्या रेंजमध्ये सराव करीत आहेत. देशभरच्या नेमबाजांमध्ये कोल्हापूरचे सर्वाधिक नेमबाज असणे, हे अभिमानास्पद आहे. सर्वच नेमबाज हे उत्कृष्ट असून, देशासाठी सुवर्ण कामगिरी करतील, हे निश्‍चित 
- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी 

 संपादन - धनाजी सुर्वे