esakal | Olympics 2020: प्रविण गड्या, तू देशासाठी पदक जिंकून आणच!
sakal

बोलून बातमी शोधा

Indian archer Pravin Jadhav

Olympics 2020: प्रविण गड्या, तू देशासाठी पदक जिंकून आणच!

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : "पुत्र व्हावा ऐसा गुंडा । ज्याचा तिन्ही लोकी झेंडा" या ओळीचा प्रत्यक्षात अर्थ समूजन घ्यायचा असेल तर तुम्ही फलटण तालुक्यातील सरडे गावातील रमेश जाधव आणि संगीता जाधव या दाम्पत्याची जरुर भेट घ्या. कारण, मोल मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करणार्‍या या माता-पित्यांनी पराक्रमी सुपुत्राच्या कर्तृत्त्वाचा डंका सध्या देशभर गाजत असून त्याच्या कर्तृत्त्वामुळे त्याच्या माता - पित्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या आस्थेने विचारपूस केली आणि केवळ फलटण तालुक्याचीच नव्हे किंबहूना संपूर्ण महाराष्ट्राची छाती अभिमानाने भरुन आली. (olympics 2020 Indian archer Pravin Jadhav Inspirational Journey)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार्‍या भारतीय खेळाडूंशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला होता. यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सरडे येथील प्रवीण जाधव या तिरंदाजाचाही समावेश होता. प्रवीण जाधव यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी त्यांच्या आई - वडिलांचीही अगदी आस्थेने चौकशी करताना ‘‘प्रकृती बरी आहे नां’’ अशी मराठीतूनही विचारपूस केली. शेतीच्या बांधावर आयुष्यभर काबाड कष्ट करुन आयुष्याचा गाडा हाकणार्‍या जाधव दाम्पत्यासाठी हा क्षण जितका अभिमानास्पद होता तितकाच भावनिकही ठरला. आपल्या लेकाचे कौतुक पंतप्रधानांच्या तोंडून ऐकताना हे माय - बाप पूरते गहिवरले. तर दुसरीकडे गावच्या सुपूत्राचा हा बहुमान ऐकून सरडेकरांसह संपूर्ण जिल्ह्याची छाती अभिमानाने भरुन आली आणि त्यामुळेच ‘‘प्रविण गड्या, तू देशासाठी पदक जिंकून आणच !‘‘, अशी भावना जिल्हावासियांच्या तोंडून व्यक्त होताना दिसू लागली आहे.

हेही वाचा: Olympics : मॅचेस कधी आणि कुठे पाहता येतील? जाणून घ्या एका क्लिकवर

मोल मजुरी करुन प्रविणच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले त्याचे आई - वडिल प्रविणप्रमाणेच खरे चॅम्पियन आहेत. प्रामाणिक कष्टाची ताकद काय असते हे प्रविणच्या पालकांनी सिद्ध करुन दाखवले आहे. तुमच्याकडे काही करुन दाखवण्याची इच्छा असेल तर कोणतीही समस्या तुम्हाला रोखू नाही शकत; हे प्रविण जाधव व त्यांच्या मात्या पित्यांनी करुन दाखवले आहे. अगदी तळागाळातून योग्य व्यक्तीची निवड झाल्यावर देशाची प्रतिभा जगात कशी उंचावली जाते हे देखील यातून सिद्ध झाले आहे. "प्रविणजी, जपान में जमकर खेलिएगा’’, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संवादादरम्यान सांगितले. पंतप्रधानांचे हे कौतुकाचे शब्द प्रविणच्या आईने जेव्हा ऐकले तेव्हा त्यांना अक्षरश: आनंदाश्रू अनावर झाले. ‘‘आम्ही त्याला फक्त जन्म द्यायचे काम केले. आर्थिक परिस्थितीमुळे त्याला कुठलीच मदत आम्हाला करता आली नाही. त्याचे सर्व प्रशिक्षक व अन्य मार्गदर्शकांच्यामुळे आज तो खेळू शकत आहे. त्याने असेच आणखी खेळत रहावे. ऑलंपिक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकून आणावे’’, अशा शब्दात आपल्या भावना प्रविणच्या आई सौ.संगिता जाधव व वडील रमेश जाधव यांनी पंतप्रधानांच्या भाषणानंतर व्यक्त केल्या.

हेही वाचा: Olympics 2020 : आखाड्यातील ढाण्या वाघाकडून गोल्डन कामगिरीची आस

प्रविणनं खडतर प्रवासातून गाठलंय शिखर

प्रविणला लहानपणीपासूनच खेळाची अतिशय आवड होती. जिल्हास्तरीय 800 मीटर धावण्याच्या स्पर्ध्येमध्ये त्याने भाग घेतला, पण शारीरिक क्षमता कमी असल्यामुळे अपेक्षित यश मिळाले नाही. त्याचे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विकास भुजबळ यांनी त्याच्या प्रशिक्षणाची आणि आहाराची आर्थिक जबाबदारी स्विकारली. त्याचा परिणाम म्हणून त्याची कामगिरी उंचावली आणि क्रीडा प्रबोधिनी शाळेत तो दाखल झाला. पुण्यातील बालेवाडी येथे एक वर्ष प्रशिक्षण घेतल्यानंतर तो तिरंदाजीच्या प्रशिक्षणासाठी अमरावतीला गेला. तेथे देखील शारीरिक निकषांवर त्याची कमी पडणारी ताकद यामुळे त्याची कामगिरी समाधानकारक होत नव्हती. विकास भुजबळ यांनी शिक्षण अधिकारी महेश पालकर यांना प्रविणला शेवटची संधी देण्याची विनंती केली. 5 शॉटची संधी मिळालेल्या प्रवीण याने 45 गुणांची कमाई करत आपले प्रशिक्षण संस्थेमधील स्थान टिकविले.

2016 मध्ये थायलंडमधील बँकॉक येथे झालेल्या आशियाई चषक स्टेज 1 स्पर्धेमध्ये त्याने भारताचे प्रथम प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या सांघिक संघातून त्याने रिकर्व्ह गटात कांस्य पदक मिळविले. त्याच वर्षी त्याने कोलंबिया देशातील मेदेयीन शहरात झालेल्या जागतिक तिरंदाजी चषक स्पर्धेमध्ये भारतीय ब संघाचे प्रतिनिधित्व केले. याच दरम्यान भारतीय तिरंदाजांच्या कंपाऊंड टिमचे प्रशिक्षक कर्नल विक्रम धायल यांचे लक्ष वेधल्यानंतर सन 2017 मध्ये प्रविण स्पोर्ट कोट्यातून भारतीय सैन्यदलात रुजू झाला.

2019 मध्ये नेदलरँडमध्ये झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये रिकर्व्ह प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश मिळवणार्‍या भारतीय संघामध्ये अतनू दास, तरुणदीप राय यांच्या बरोबरीने प्रवीण जाधवने भारतासाठी या तब्बल 14 वर्षांनंतर रौप्य पदक पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आणि आता टोकियो ऑलंपिकमध्ये देशासाठी पदकाचा अचूक वेध घेण्यासाठी तिरंदाज प्रविण जाधव आपल्या सहकारी खेळाडूंसमवेत सज्ज झाला आहे.

सरडे गावचा स्वाभिमान आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता प्रविण जाधव याची ऑलंपिकसाठी झालेली निवड आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रविणचे केलेले कौतुक आम्हा सरडे ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद असून प्रविण ऑलंपिकस्पर्धेत गोल्ड मेडल जिंकून आपल्या भारताचा तिरंगा जपानमध्ये नक्कीच उंचावेल’’, अशी प्रतिक्रिया सरडे ग्रामस्थांच्यावतीने माजी सरपंच दत्ता भोसले यांनी दिली.

loading image