विश्‍वकरंडक फुटबॉल पात्रता फेरीत भारताची ओमाविरुद्ध अखेर हार 

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

गुवाहटी - विश्‍वकरंडक फुटबॉल पात्रता फेरीत यजमान भारताला सामन्याच्या अखेरच्या दहा मिनिटांपर्यंत राखलेली आघाडी टिकविण्यात अपयश आले. अखेरच्या दहा मिनिटांतील आठ मिनिटांत ओमानने दोन गोल करत भारतावर 2-1 असा विजय मिळविला.

गुवाहटी - विश्‍वकरंडक फुटबॉल पात्रता फेरीत यजमान भारताला सामन्याच्या अखेरच्या दहा मिनिटांपर्यंत राखलेली आघाडी टिकविण्यात अपयश आले. अखेरच्या दहा मिनिटांतील आठ मिनिटांत ओमानने दोन गोल करत भारतावर 2-1 असा विजय मिळविला.

येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक मैदानावर झालेल्या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने केलेल्या गोलच्या जोरावर भारताने आघाडी मिळविली होती. या दोन्ही संघात गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात झालेला मैत्रीपूर्ण सामना गोलशून्य बरोबरीत राहिला होता. "फिफा'ची मान्यता असलेल्या एकाही स्पर्धेत भारत ओमानवर विजय मिळवू शकलेले नाहीत. जागतिक क्रमवारीतील भारताचे 103वे आणि ओमानचे 87वे स्थान आहे. अशा परिस्थितीत या वेळी थेट विश्‍वकरंडक पात्रता फेरीत भारताने 24व्या मिनिटाला आघाडी घेतली होती.

ब्रॅंडन फर्नांडिसने घेतलेल्या फ्री-किकवर काहिशा उशिराने छेत्रीने ताबा मिळविला. या वेळी छेत्रीला लक्ष्य करण्यात ओमानच्या खेळाडूंची गफलत झाली आणि छेत्रीने याचा फायदा उठवून चेंडूला जाळीची दिशा दिली. यानंतर भारताने मोठ्या हिकमतीने सामन्याच्या 82व्या म्हणजे अखेरच्या टप्प्यापर्यंत ही आघाडी कायम राखली होती. अखेरच्या क्षणी कच खाण्याची भारताची जुनी खोड पुन्हा महागात पडली. ओमानच्या रबिया सईद अल अलवाई अल मंधार याने गोलकक्षात मुसंडी मारली. भारताचा गोलरक्षक त्याला अडवण्यासाठी पुढे आला याचा अंदाज घेत मंधारने चेंडू अलगद लॉब करून ओमानला बरोबरी साधून दिली. या बरोबरीनंतर ओमानचे खेळाडू जणू प्रेरित झाले आणि अतिशय आक्रमक खेळ करून त्यांनी भारतीय बचावफळीवर दडपण आणले. याचा फायदा त्यांना झाला. सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला मंधारनेच पुन्हा एकदा भारताच्या बचावपटूला बगल देत गोलरक्षक गुरप्रीतला चकवले आणि ओमानचा विजय साकार केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oman beat India 2-1