esakal | पेस-भूपतीने परिपक्वता दाखवावी
sakal

बोलून बातमी शोधा

पेस-भूपतीने परिपक्वता दाखवावी

पेस-भूपतीने परिपक्वता दाखवावी

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - डेव्हिस करंडकासाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर कर्णधार महेश भूपती आणि लिएंडर पेस यांच्यातील शाब्दिक युद्धाला तोंड फुटले आहे. एकमेकांवर आरोप करण्यात दोघेही कमी पडत नाहीत. अशा वेळी भारतीय टेनिस महासंघाने दोघांची कानउघाडणी करताना परिपक्वता दाखवण्याचा सल्ला दिला आहे.

महेश भूपती आणि पेस यांच्यात झालेले "व्हॉट्‌सअप' चॅट भूपतीने उघड केले. त्यानंतर पेसने भूपतीच्या या कृतीवर जाहीर आक्षेप घेतला. खासगी चर्चा त्याने अशी सर्वांसमोर आणणे योग्य नाही. संघ निवडताना त्याने आपल्या पदाचा गैरवापर केला असे उत्तर दिले. हा वाद प्रसार माध्यमांमध्ये चांगलाच चर्चेत राहिला.

या पार्श्‍वभूमीवर भारतीय टेनिस महासंघाचे सचिव हिरोन्मय चॅटर्जी यांनी दोघांना सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला. ते म्हणाला, 'इतकी वर्षे आंतरराष्ट्रीयस्तरावर खेळल्यानंतर ते नक्कीच परिपक्व आहेत. टेनिसपटूंसमोर त्यांचा आदर्श आहे. अशा वेळी त्यांनी कोर्टबाहेरही आपण परिपक्व आहोत हे दाखवण्याची गरज आहे. जे काही सुरू आहे ते बरोबर नाही. दोघांशी चर्चा करून आम्ही त्यांना समज दिली आहे.''

संघ निवडीबाबत टेनिस महासंघानेही कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अशावेळी पेसनेदेखील ही चर्चा थांबवावी असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ""संघ निवडीचे अधिकार कर्णधाराला देण्यात आले होते. अशा वेळी पेसने खिलाडूवृत्तीने तो निर्णय स्वीकाराणे आवश्‍यक होते. त्याने लढत सुरू असताना त्या विषयावर बोलणे योग्य नव्हते. भूपतीने हा नियम पाळला. त्याने लढत संपल्यावर वक्तव्य केले.''

पेस-भूपती यांच्यातील संबंधित चॅट वाचल्यानंतर दोघांनी एकत्र बसून हा वाद सोडविण्याची वेळ आली असल्याचे मत टेनिस महासंघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.

भारताला पुन्हा जागतिक गटात प्रवेश मिळवून देण्यासाठी मला माझ्या कल्पना राबविण्याचा पूर्ण अधिकार मिळाला होता, असे भूपतीने आपल्या फेसबुक पेजवर लिहिले आहे. या संदर्भात चॅटर्जी याने भूपतीचे समर्थन केले. ते म्हणाले, 'कर्णधार या नात्याने भूपतीने प्रत्येक निर्णय घेताना आमच्याशी चर्चा केली होती आणि प्रत्येक मुद्यावर तो आमच्याशी संवाद साधून होता. यात गैर काहीच नाही. त्यामुळे या मुद्यावरून वाद होण्याचा प्रश्‍नच येत नाही.''

loading image