कर्तारपूरचा आधार घेत पाक टेनिस संघटनेचे अपील

वृत्तसंस्था
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

भारताविरुद्धची डेव्हिस करंडक त्रयस्थ देशाऐवजी मायदेशात खेळवण्यासाठीचे प्रयत्न पाकिस्तान टेनिस महासंघाने सुरू केले आहेत. कर्तारपूरचा कार्यक्रम सुरळीत पार पडल्यामुळे भारत-पाकिस्तान लढत पाकमध्ये होण्यास काहीच प्रश्‍न नसल्याचा त्यांनी दावा केला आहे.

इस्लामाबाद : भारताविरुद्धची डेव्हिस करंडक त्रयस्थ देशाऐवजी मायदेशात खेळवण्यासाठीचे प्रयत्न पाकिस्तान टेनिस महासंघाने सुरू केले आहेत. कर्तारपूरचा कार्यक्रम सुरळीत पार पडल्यामुळे भारत-पाकिस्तान लढत पाकमध्ये होण्यास काहीच प्रश्‍न नसल्याचा त्यांनी दावा केला आहे.

पाकिस्तानात सुरक्षेचा कोणताही प्रश्‍न नाही. आम्ही डेव्हिस लढतीच्या संयोजनास पूर्ण तयार आहोत. दोन देशातील राजकीय प्रश्‍नाचा लढतीच्या आयोजनावर परिणाम होण्याचे काहीच कारण नाही. कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करण्याचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. त्यावरून दोन्ही देशांत तणाव असताना पाकिस्तान डेव्हिस करंडक लढतीचे संयोजन करू शकते, असे पाकिस्तान टेनिस महासंघाचे अध्यक्ष सलीम सैफुल्ला यांनी सांगितले.

डेव्हिस करंडकाच्या आशिया-ओशियाना गटातील भारत-पाक लढत मूळ कार्यक्रमानुसार 14 आणि 15 सप्टेंबरला इस्लामाबादला होणार होती. इस्लामाबादच्या पाकिस्तान क्रीडा संकुलात यापूर्वी उझबेकिस्तान, कोरिया आणि थायलंड गेल्या दोन वर्षांत खेळले आहेत. आता नोव्हेंबरच्या अखेरीस होणारी ही लढत त्रयस्थ ठिकाणी घेण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने घेतला आहे. त्याविरुद्ध पाक टेनिस संघटनेने दाद मागितली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय 15 नोव्हेंबरपर्यंत अपेक्षित आहे.

आम्ही कोणतेही त्रयस्थ ठिकाण लढतीसाठी सूचवणार नाही. त्याऐवजी भारतास हा पर्याय देण्यास सांगणार आहोत. भारतीय टेनिस पदाधिकारी इस्लामाबादमधील जमात उलेमा-ए-इस्लाम-फझीच्या आंदोलनाचा आधार घेत आहेत, असाही आरोप पाक करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pak tennis association referred kartarpur corridor for the match against india