Asia Cup 2023 : पाकिस्तानने टेकले गुडघे! जय शहांच्या भेटीसाठी सेठी लावत आहेत जुगाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asia Cup 2023 PCB vs BCCI

Asia Cup 2023: पाकिस्तानने टेकले गुडघे! जय शहांच्या भेटीसाठी सेठी लावत आहेत जुगाड

Asia Cup 2023 PCB vs BCCI : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया कप 2023 बाबत आपली भुमिका थोडी नरमाईची केली असून पाकिस्तान आता हा विषय चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी हे बीसीसीआयचे सचिव आणि एशियन क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष जय शहा यांना भेटण्यासाठी जुगाड करत आहेत.

जर जय शहा आंतरराष्ट्रीय टी 20 लीगचा पहिला सामना पाहण्यासाठी जातील तर नजम सेठी त्यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते आशिया कपच्या यजमानपदाबाबतचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील.

हेही वाचा: IND vs SL: चर्चा तर होणारच! सचिन-विराट तुलनेवर गंभीरने केले रोखठोक वक्तव्य

माध्यमांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी जोडल्या गेलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'नजम या संधीचा फायदा एसीसी सदस्यांसोबतचे नाते सुधारण्याबाबत आणि आशिया कप 2023 चे आयोजन पाकिस्तानात करण्याबाबत बोलणी करतील. नजम हे लीगचा पहिला सामना पाहण्यासाठी जात आहे कारण तेथे जय शहा येणार आहेत.'

बीसीसीआयने अजून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. जय शहा आणि इतर पदाधिकारी लीगच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही.

याचबरोबर जरी जय शहा एसीसी अध्यक्ष असले तरी त्यांना या कार्यक्रमाला बीसीसीआयचे सचिव म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ते पीसीसीबीच्या अध्यक्षांशी अनौपचारिकरित्या भेटतील का हा देखील प्रश्न आहे.

हेही वाचा: Virat Kohli VIDEO : सूर्यानं घेतली मुलाखत; विराट म्हणतो आम्ही इतक्या वर्षापासून आहे मात्र तू आलास अन्...

जय शहा यांनी एसीसी अध्यक्ष या नात्याने गेल्या वर्षी आशिया कप पाकिस्तानात नाही तर त्रयस्थ ठिकाणी खेळवला जाईल असे सांगितले होते. त्यानंतर तत्कालीन पीसीबीचे चेअरमन रमीझ राजा यांनी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान सामील होणार नाही अशी धमकी दिली होती.

काही दिवसांपूर्वीच जय शहा यांनी एशियाई क्रिकेटचा दोन वर्षाचा कार्यक्रम जाहीर केला. यावर देखील नवीन पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनी खोचक टीका केली होती. एसीसीने यावर पलटवार करत पाकिस्तानचेच दात घशात घातले होते. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नर्माईच्या आणि चर्चेच्या गोष्टी करत आहेत.

(Sports Latest News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?