esakal | पाकिस्तानशी खेळण्याबाबत चेंडू सरकारच्या कोर्टात!
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI

पाकिस्तानशी खेळण्याबाबत चेंडू सरकारच्या कोर्टात!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याबाबत आपल्या देशाची भूमिका कळवा, अशी अधिकृत विचारणा अखेर बीसीसीआयने केंद्र सरकारकडे केली आहे. पाकिस्तानबरोबर २०१२ पासून द्विपक्षीय मालिका झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर पाक मंडळाकडून वारंवार तगादा लावण्यात येत आहे; त्यामुळे बीसीसीआयने सरकारच्या कोर्टात हा चेंडू टाकला आहे.

जोपर्यंत केंद्र आम्हाला हिरवा कंदील दाखवत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही द्विपक्षीय मालिकेत खेळणार नाही, असे बीसीसीआयकडून प्रत्येक वेळी सांगण्यात आलेले आहे. 

द्विपक्षीय मालिका खेळण्याचा २०१४ मध्ये झालेला  करार बीसीसीआयने धुडकावल्यामुळे पाक मंडळाने ७ कोटी डॉलरची नुकसानभरपाई मागितली आहे. या पार्श्‍वभूमीवर आयसीसीची वादनिवारण समिती चर्चा करणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने केंद्राकडे विचारणा केली आहे.

हा रुटीन संपर्क आहे; तसेच कोणत्याही मालिकेसाठी सरकारची परवानगी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्हाला अधिकृत माहिती मिळाल्यावर आम्ही ती समितीला कळवू, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. 

एकमेकांच्या देशात खेळात येत नसेल, तर त्रयस्थ देशात तरी मालिका खेळण्यास बीसीसीआय का नकार देते, अशी तक्रार पाक मंडळाकडून वादविवाद निवारण समितीकडे करण्यात आलेली आहे. भारत-पाक मंडळातील वादविवाद निवारण समितीची बैठक मिशेल ब्लेऑफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही घडामोड घडली आहे.

loading image
go to top