इस्लामाबाद : भारताविरुद्धच्या डेव्हिस करंडक लढतीचे संयोजन आपल्याच देशात राखण्यास अपयशी ठरल्यावर पाकिस्तानने लढतीपूर्वीच जणू रॅकेट खाली ठेवल्या आहेत. त्यांनी 17 वर्षांखालील दोघा खेळाडूंची निवड केली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांना या लढतीतून मिळणारा अनुभव भविष्यात उपयोगी पडेल असे सांगितले आहे.
भारत-पाकिस्तान लढत त्रयस्थ ठिकाणी होईल असे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने जाहीर केल्यावर पाकिस्तानने त्यास विरोध केला होता. एवढेच नव्हे, तर विरोधाची योजना तयार असल्याचे सांगितले होते; मात्र आता जागतिक कुमार क्रमवारीत अव्वल चारशे खेळाडूंमध्ये स्थान नसलेल्या दोघांची निवड केली आहे.
ऐसाम उल हक कुरेशी आणि अकील खान या अव्वल खेळाडूंनी या लढतीतून माघार घेतल्यामुळे भारतास पराजित करण्याच्या पाकच्या धुसर आशाही पूर्ण दुरावल्या असल्याचे मानले जात आहे. ऐसाम आणि अकीलच्या अनुपस्थितीत हुझैफा अब्दुल रेहमान आणि शोएब खान यांची निवड केली आहे. जागतिक कुमार क्रमवारीत हुझैफा 446 व्या; तर शोएब 1004 व्या स्थानी आहे. या संघातील युसुफ खान, अहमद कामील हेही नवोदितच आहेत.
पाकिस्तानात लढत झाली असती तर चांगला सामना झाला असता. आता कझाकस्तानमध्ये आमचे वरिष्ठ खेळाडू खेळणार नाहीत. आम्ही कुमार संघच पाठवत आहोत. या 16-17 वर्षांच्या खेळाडूंना चांगला अनुभव मिळेल, असे पाकिस्तान टेनिस महासंघाचे अध्यक्ष सलीम सैफुल्ला खान यांनी सांगितले. वरिष्ठ खेळाडू असतानाही पाक उझ्बेकिस्तानविरुद्ध 0-4 पराजित झाले होते.
भारताला हा सामना जिंकायचाच होता, आता ते सहज सामना जिंकू शकतील. रोज शेकडो भारतीय पाकिस्तानात येतात. इस्लामाबादमधील हॉटेलमध्ये भारतीयांचाच मुक्काम जास्त असतो, पण सहा टेनिसपटू पाकिस्तानात खेळायला येऊ शकत नाहीत.
- सलीम सैफुल्ला खान, पाकिस्तान टेनिस महासंघाचे अध्यक्ष
|