Record Book: तब्बल 970 मिनिटे बॅटिंग करणारा खेळाडू, 42 वर्षांनंतर मोडला वर्ल्ड रेकॉर्ड

hanif mohamad.png
hanif mohamad.png

नवी दिल्ली- जागतिक क्रिकेटमध्ये सर्वकालीन सर्वश्रेष्ठ पाकिस्तानी फलंदाजांच्या नावाची जेव्हा चर्चा होते. त्यावेळी आपसूकच सर्वात आधी हनीफ मोहम्मद यांच्या नावाचा उल्लेख होतो. गुजरातमधील जुनागड येथे जन्मलेले हनीफ मोहम्मद यांनी 1952 मध्ये भारताविरोधात आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु केली होती. 5 फूट 7 इंच उंची असलेल्या हनीफ मोहम्मद यांना लिटिल मास्टर नावाने ओळखले जात. 

त्या काळच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होता. त्यांनी करिअरमध्ये 55 कसोटी सामने खेळले आणि यादरम्यान 43.98च्या सरासरीने 3915 धावा केल्या. यामध्ये 12 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश होता. त्यांनी करिअरमध्ये 238 प्रथमश्रेणी सामने खेळले आणि त्यांनी 52.32 च्या सरासरीने 17059 धावा केल्या. यादरम्यान त्यांनी 55 शतके आणि 66 अर्धशतके ठोकली. 499 ही त्यांची सर्वोच्च खेळी होती. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी म्हणून त्यांचा हा वर्ल्ड रेकॉर्ड अनेक वर्षे कायम होता. वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने 1994 मध्ये हा विक्रम आपल्या नावे केला. 

विंडीजविरोधात तिहेरी शतक
हनीफ मोहम्मद यांनी आपल्या कसोटी करिअरमध्ये अनेक अविस्मरणीय खेळ्या केल्या. त्यांनी विंडीजविरोधात 1958 मध्ये बार्बाडोसमधील 337 धावांची त्यांची ऐतिहासिक खेळी आजही स्मरणात आहे. 23 जानेवारी 1958 मध्ये खेळलेल्या मॅरेथॉन खेळीत हनीफ मोहम्मद यांनी आपल्या संघाला पराभवापासून वाचवत वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. जो आजही अबाधित आहे. 

संघाला पराभवापासून वाचवण्यासाठी 970 मिनिटे बॅटिंग
या सामन्यात हनीफ मोहम्मद यांनी 970 मिनिटे सुमारे 16 तास 10 मिनिटे फलंदाजी केली होती. एवढ्या वेळात फुटबॉलचे 11 सामने होतात. या मॅचमध्ये यजमान विंडीजने कोनार्ड हंट (142) आणि एवर्टन विक्स (197) यांच्या शतकीय खेळीच्या जोरावर 9 विकेटवर 579 धावांवर डाव घोषित केला होता. त्यानंतर कॅरेबियन गोलंदाजांच्या भात्यासमोर पाहुण्या पाकचा डाव केवळ 106 धावांवर आटोपला. त्यामुळे त्यांना फॉलोऑन स्वीकारावा लागला. 

त्यामुळे पाकिस्तानवर डावाने पराभूत होण्याचे वादळ घोंघावत होते. त्यावेळी पहिल्या डावात 17 धावा करणारे हनीफ मोहम्मद यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत इम्तियाज अहमद यांच्या साथीने जबरदस्त शतकी भागीदारी केली. पाकने एका विकेटवर 152 धावा केल्या. इम्तियाज 91 धावा करुन बाद झाला. परंतु, दुसऱ्या टोकाला हनीफ यांनी मोर्चा सांभाळला होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत हनीफ 61 धावांवर नाबाद होते. पाकिस्तानने 162 धावांवर 1 गडी गमावला होता. 

सामन्याच्या चौथ्या दिवशीही हनीफ दिवसभर पिचवर टिकून होते. त्यांनी आपले शतक पूर्ण केले. दिवसाचा खेळ संपताना पाकच्या 2 विकेटच्या बदल्यात 339 धावा झाल्या होत्या. त्यात हनीफ 161 धावांवर नाबाद होते. पाचव्या दिवशीही हनीफ यांची मॅरेथॉन खेळी कायम होती. हनीफ सलग तिसऱ्या दिवशी नाबाद 270 धावांवर होते. पाचव्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पाकिस्तानच्या 3 बाद 525 धावा झाल्या होत्या. त्यांनी आपला पराभव जवळपास टाळलाच होता. 

तिहेरी शतक ठोकणारे पहिलेच अशियाई
सहाव्या दिवशी हनीफ फलंदाजीसाठी उतरले आणि त्यांनी आपले तिहेरी शतक पूर्ण केले. त्यांनी 970 मिनिटे फलंदाजी केली. 337 धावांवर ते धावबाद झाले. कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक ठोकणारे ते पहिले अशियाई खेळाडू होते. त्यांची ही खेळी वेळेनुसार सर्वांत मोठी होती. कारण धावांच्या बाबतीत त्याकाळी त्यांची दुसरी सर्वात मोठी कसोटी खेळी होती. आपल्या खेळीत त्यांनी 24 चौकार ठोकले होते. त्यांच्या या खेळीमुळे फॉलोऑन मिळाल्यानंतरही पाकिस्तानने पुनरागमन करत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवले.

विंडीजने या डावात तब्बल 319 षटके टाकली
या सामन्याच्या पहिल्या डावात 42.2 षटकांत 106 नेस्तनाबूत झाल्यानंतर 473 धावांनी मागे असलेल्या पाकिस्तानी टीमने दुसऱ्या डावात 319 षटके फलंदाजी केली आणि 8 विकेटच्या बदल्या 657 धावांवर डाव घोषित केला. वर्ष 1999-2000 पर्यंत त्यांची खेळी वेळेच्या हिशोबाने प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वात मोठी होती. परंतु, रणजी ट्रॉफीमध्ये हिमाचल प्रदेशचा फलंदाज राजीव नय्यरने उत्तर प्रदेशविरोधात 1015 मिनिटांपर्यंत फलंदाजी करताना हा विक्रम आपल्या नावे केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com