पोलिस कर्मचारी सचिन शिंदे यांना सुवर्णपदक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मार्च 2019

दररोज पाऊणतास व्यायाम करतो. तसेच अंडी, चिकन, दूध असा आहार घेतो. मला दोन मुली असून त्याही जिम्नॅस्टिकमध्ये सहभागी होतात. पत्नीची चांगली साथ मिळते. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत आहे. 
सचिन शिंदे, पोलिस कर्मचारी 

पुणे - पोलिस दलामध्ये नोकरी करताना कधी घरी पोचण्याची, चांगला आहार वेळेवर मिळण्याचा ताळमेळ कधी जुळत नाही. पण, पुणे पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याने योग्य आहार, नियमित व्यायामावर भर देत चांगली शरीरयष्टी कमावली. राष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. सचिन शिंदे असे त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

राजस्थानमधील जयपूर येथील राष्ट्रीय पोलिस शरिरसौष्ठव स्पर्धेत त्यांनी 70 किलो गटात सुवर्णपदक पटकाविले. यापूर्वी 2002 ते 2004 दरम्यान त्यांनी पुणे श्री सुवर्णपदक, 2003-2004 दरम्यान पंजाबमधील खालसा विद्यापीठ, ज्युनियर मिस्टर इंडिया, सिल्व्हर पुणे, जालंधरमधील स्पर्धेत मिस्टर इंडिया, असे किताब मिळविले आहेत. 2014 मध्ये नाशिक येथील स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला होता. शिंदे 2005 मध्ये पुणे पोलिस दलात रुजू झाले. सध्या ते गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या यशाबद्दल पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी शिंदे यांचा सत्कार केला. पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे, समीर शेख यांनीही शिंदे यांचे कौतुक केले. 

दररोज पाऊणतास व्यायाम करतो. तसेच अंडी, चिकन, दूध असा आहार घेतो. मला दोन मुली असून त्याही जिम्नॅस्टिकमध्ये सहभागी होतात. पत्नीची चांगली साथ मिळते. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत आहे. 
सचिन शिंदे, पोलिस कर्मचारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Officer Sachin Shinde Gold Medal