पूजा, सोनियाच्या पराभवाने बॉक्‍सिंग संघटनेस आरसा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

जागतिक उपविजेती सोनिया चाहल आणि आशियाई विजेती पूजा राणी यांना जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेच्या निवड चाचणीत पराजित व्हावे लागले. त्यांनी चाचणीविनाच मेरी कोमची निवड केलेल्या भारतीय बॉक्‍सिंग संघटनेस जणू आरसाच दाखवला आहे.

मुंबई / नवी दिल्ली : जागतिक उपविजेती सोनिया चाहल आणि आशियाई विजेती पूजा राणी यांना जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेच्या निवड चाचणीत पराजित व्हावे लागले. त्यांनी चाचणीविनाच मेरी कोमची निवड केलेल्या भारतीय बॉक्‍सिंग संघटनेस जणू आरसाच दाखवला आहे.

सहा वेळची जगज्जेती मेरी कोम आणि जागतिक ब्रॉंझविजेती लोवलिना बोरोगोहैन यांची चाचणीविनाच भारतीय संघात निवड करण्यात आली. उर्वरित आठ गटासाठी चाचणी झाली. त्यात सोनिया आणि पूजा या देशातील अव्वल बॉक्‍सर पराजित झाल्या. एवढेच नव्हे; तर मंजू राणी, जमुना बोरो, नीरज, मंजू बॉम्बोरिया आणि नंदिनी यांनी प्रथमच जागतिक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवले.

जागतिक उपविजेती सोनियाला झुंजार मनीषा मौन हिने पराजित केले. मात्र रशियात सुवर्णपदक जिंकलेल्या नीरजने मनीषाला हरवत 57 किलो गटात अव्वल क्रमांक मिळवला.

आशियाई विजेत्या पूजाने रशियातील स्पर्धेत ब्रॉंझ जिंकले होते. तिने चाचणीच्या सुरुवातीच्या फेरीत इंडिया ओपन विजेत्या भाग्यबाती काचारी हिला हरवले; पण स्वीटी बूरा हिने पूजाला एकतर्फी लढतीत हरवत केवळ इतिहासानुसारच संघनिवड करू नये, असे दाखवले.

दरम्यान, मेरी कोमची थेट निवड करण्याच्या निर्णयावर टीका होत आहे. मायकेल फेल्प्सने सातत्याने हुकुमत राखल्यावरही त्याला देशात चाचणी द्यावी लागली होती. भारताचे पदकविजेते कायम आपली निवड गृहीत धरतात; त्याचा फटका बसतो, अशी टिपण्णी समाजमाध्यमावर केली जात आहे.

मेरीचा दबदबा यापूर्वीही
- 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चाचणीत मेरी कोम पिंकीविरुद्ध पराजित. मेरीचा कायम आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप
- 2015 चाचणीविनाच मेरी कोमची ऑलिंपिक चाचणी स्पर्धेसाठी निवड, मेरी पात्रतेतच गारद
- गतवर्षी मेरी कोमचे जगज्जेतेपद ऑलिंपिकमध्ये स्थान नसलेल्या 48 किलो गटात
- 51 किलो गटाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झरीनची कामगिरी मेरीपेक्षा सरस
- 2019 च्या आशियाई स्पर्धेतून मेरीची माघार, त्या वेळी झरीनचे ब्रॉंझ

भारतीय संघ - 48 किलो ः मंजू राणी. 51 किलो ः मेरी कोम. 54 किलो ः जमुना बोरो. 57 किलो ः नीरज. 60 किलो ः सरिता देवी. 64 किलो ः मंजू बोम्बोरिया. 69 किलो ः लोवलिना बोरगोहैन. 75 किलो ः स्वीटी बूरा. 81 किलो ः नंदिनी. 81 किलोपेक्षा जास्त ः कविता चाहल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pooja, sonia lost in world boxing selection trials after mary kom was selectied without trial