पृथ्वीचा अहवाल बीसीसीआयकडे मे महिन्यातच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पृथ्वी शॉ उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याचा अहवाल भारतीय क्रिकेट मंडळास मेच्या सुरुवातीसच मिळाला होता. पण पृथ्वी शॉला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्याचे ठरल्यामुळे तो केवळ आयपीएलच नव्हे, तर मुंबई ट्‌वेंटी-20 लीगही खेळला असल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली : पृथ्वी शॉ उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याचा अहवाल भारतीय क्रिकेट मंडळास मेच्या सुरुवातीसच मिळाला होता. पण पृथ्वी शॉला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्याचे ठरल्यामुळे तो केवळ आयपीएलच नव्हे, तर मुंबई ट्‌वेंटी-20 लीगही खेळला असल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय क्रिकेट मंडळाने 2013 पासून अडीचशे खेळाडूंची चाचणी घेतली. पृथ्वीची चाचणी 22 फेब्रुवारीस झाली. त्याच्याबाबतचा अहवाल 10 दिवसांत अपेक्षित होता, पण तो मेच्या सुरुवातीस मिळाला. त्याला पुरेसा वेळ देण्याची गरज होती, असे भारतीय क्रिकेट मंडळाचे उत्तेजक प्रतिबंधक व्यवस्थापक डॉ. अभिजीत साळवी यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. आता अहवाल येण्यास उशीर का झाला याची कोणालाच माहिती नाही.

चाचणीच्या निकालाविरोधात दाद मागायची आहे, असे पृथ्वीला विचारण्यात आले. त्याने चूक मान्य केल्यामुळे लवादाची नियुक्ती करण्याची गरज भासली नाही. पृथ्वीच्या नमुन्यात उत्तेजकांचा स्तर मीठाइतकाच होता. त्यामुळे त्याने कामगिरी उंचावण्यासाठी उत्तेजक घेतली नव्हती हे सिद्ध होते. त्याच्यावरील अंतिम आरोप 16 जुलैस ठेवण्यात आले. त्यापासून मागे चार महिने करण्यासाठीच 16 मार्चपासून आठ महिन्याची बंदी आली, असेही साळवी यांनी सांगितले.

उत्तेजक नियमांची कल्पना असणारच
भारतीय क्रिकेट मंडळाच्या उत्तेजक प्रतिबंधक कार्यक्रम तसेच हेल्पलाईनबाबत पृथ्वीला पुरेपूर कल्पना होती. त्याने यासंदर्भात भारतीय मंडळाच्याच तीन सत्रात उपस्थित राहिला आहे. 2018 च्या 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेच्यावेळी झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मार्गदर्शन शिबिरासही उपस्थित असणार. पण, त्याने सर्व सूचनांकडे दुर्लक्षच केले. कफ सिरप धोकादायक नसेल असे त्याला वाटले असेल, असेही साळवी म्हणाले.

पूर्वी उत्तेजकांबाबत खेळाडू बेफिकीर होते, मात्र युसुफ पठाण दोषी आढळल्यावर अनेक खेळाडू औषध घेण्यापूर्वी विचारणा करीत आहेत. आम्ही सतत करीत असलेल्या मार्गदर्शनामुळे हे घडत असल्याचे त्यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prithwi;s report was with bcci in the month of may