Pro Kabaddi 2019 : महाराष्ट्र डर्बी बरोबरीत 

वृत्तसंस्था
Thursday, 5 September 2019

महाराष्ट्र डर्बी म्हणून ओळखली जाणारी प्रो-कबड्डी मधील पुणेरी पलटण आणि यु मुम्बा यांच्यातील गुरुवारी झालेली लढत 33-33 अशी बरोबरीत राहिली.

बंगळूर -  महाराष्ट्र डर्बी म्हणून ओळखली जाणारी प्रो-कबड्डी मधील पुणेरी पलटण आणि यु मुम्बा यांच्यातील गुरुवारी झालेली लढत 33-33 अशी बरोबरीत राहिली. सततच्या पराभवातून वाचल्याचे पुणे, तर हातातून निसटत चाललेला सामना बरोबरीत सोडविल्याचे समाधान मुंबई संघाला मिळाले. 

अभिषेकच्या चढाया आणि संगदीप नरवालने बचावात दाखवलेल्या ताकदीच्या जोरावर मुंबई संघाने विश्रांतीला जरूर 16-12 अशी आघाडी मिळवली होती. मात्र, उत्तरार्धात त्यांना ती टिकविण्यात अपयश आले. पंकज मोहितने याने राखीव खेळाडू म्हणून उतरविल्यावर पुन्हा एकदा जोरदार खेळ करून पुण्याचे आव्हान जिवंत ठेवले होते. त्याच्या फसव्या चढायांनी पुण्याने मुंबईवर लोण देण्याची कामगिरीही साधली. 

उत्तरार्धातील पंकजच्या चढायांमुळे नितीन तोमरचे अपयश पुणे संघाला झाकता आले. त्याचबरोबर आज मनजीतने चढायांबरोबर बचावातही तीन गुणांची कमाई करून आपल्या अष्टपैलू खेळाने चोख जबाबदारी पार पाडली. पकगडींमध्ये 12-11 असे निसटते वर्चस्व राखले असले, तरी बचावातच केलेल्या चुकांमुळे त्यांना सामन्यावर वर्चस्व राखता आले नाही. मुंबईने आक्रमणाच्या आघाडीवर 18-12 असे वर्चस्व राखले. अभिषेकने चढायांमध्ये मिळविलेल्या 11 गुणांमुळेच मुंबईला सरते शेवटी पराभव वाचवण्यात यश आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Puneri Paltan and U Mumba draw