Pro Kabaddi 2019 : चढाईपटूंच्या शर्यतीत  पुण्याचा तेलुगूवर विजय 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 August 2019

प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमातील दिल्ली टप्प्याच्या अखेरच्या दिवशी नितीन तोमर, मनजीत या पुणे, तर सिद्धार्थ देसाई या तेलुगू संघाच्या चढाईपटूंमध्ये रंगलेल्या सामन्यात पुणे संघाने बाजी मारली. त्यांनी तेलुगू टायटन्स संघावर 34-27 असा विजय मिळविला. 

नवी दिल्ली - प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमातील दिल्ली टप्प्याच्या अखेरच्या दिवशी नितीन तोमर, मनजीत या पुणे, तर सिद्धार्थ देसाई या तेलुगू संघाच्या चढाईपटूंमध्ये रंगलेल्या सामन्यात पुणे संघाने बाजी मारली. त्यांनी तेलुगू टायटन्स संघावर 34-27 असा विजय मिळविला. 

पुणे संघाकडून नितीन तोमर मैदानात उतरल्यामुळे त्यांची ताकद वाढली होती. त्याच्या बोनस घेण्याच्या कौशल्यामुळे पुणे संघाला गुण मिळत होते, तर दुसरीकडे उंचीचा फायदा घेत मनजीतने तेलुगूच्या बचावपटूंनी केलेले पकडीचे धाडसी प्रयत्न उधळून लावत पुणे संघाची बाजू लावून धरली. दुसरीकडे सिद्धार्थ देसाई आपल्या कौशल्यपूर्ण चढायांनी तेलुगूचे आव्हान राखून होता. 

विश्रांतीच्या दोन गुणांच्या निसटत्या आघाडीनंतर उत्तरार्धात तेलुगूच्या सी अरूण आणि विशाल भारद्वाजच्या भक्कम बचावामुळे सामन्यातील चुरस वाढली होती. दोघांना "हाय फाईव्ह' पूर्ण केले. पण, त्यानंतरही तोमर आणि मनजीतला रोखण्यात आलेले अपयश, तसेच पूर्वार्धात स्विकारावा लागलेला लोण यामुळे तेलुगू अखेरपर्यंत बॅकफूटवरच राहिले. यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. चढाईतील पुण्याचे (15-10) वर्चस्व तेलुगूच्या बचावातील (17-14) वर्चस्वाला भारीच पडले. 

नविनचा विक्रम, दिल्ली अपराजित 
दुसऱ्या सामन्यात घरच्या मैदानावर दबंग दिल्लीने आपला अखेरचा सामनाही जिंकला. यंदाच्या मोसमात घरच्या मैदानावर चारही सामने जिंकणारा दिल्ली हा एकमेव संघ ठरला. याचबरोबर त्यांच्या नवीन कुमारने याने सलग नवव्या सामन्यात "सुपर टेन' कामगिरी करण्याचा विक्रम केला. गेल्या सामन्यात त्याने प्रदीप नरवालच्या कामगिरीची बरोबरी केली. आज प्रदीपच्याच पाटणा पायरेट्‌स विरुद्ध त्याने नवा विक्रम केला. दिल्लीने नवीनच्याच खेळाच्या जोरावर पाटणाचे आव्हान 38-35 असे मोडून काढले. नवीनने 15 गुणांची कमाई केली. पाटणाकडून प्रदीप नरवालने 18 गुणांची नोंद केली. मात्र, त्याला सहकाऱ्यांची साथ मिळाली नाही. बचावात पुन्हा एकदा आलेले अपयश पाटणाला महागात पडले. त्यांच्या या अपयशामुळे माजी विजेता पाटणा संघ 11 सामन्यात 3 विजय, 8 पराभवांसह अवघ्या 19 गुणांनी अखेरच्या स्थानावर फेकला गेला आहे. गुणतक्‍त्यात पुणे संघ आज विजय मिळविल्यानंतरही दहाव्या स्थानावरच राहिला आहे. तेलुगू संघ 24 गुणांसह अकराव्या स्थानावर आहे. गुणतक्‍त्यात दिल्ली संघ आघाडीवर असून, बंगाल दुसऱ्या आणि जयपूर संघ तिसऱ्या स्थानवर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Puneri Paltan beat 34-27