Pro Kabaddi 2019 : पाटणा पायरेट्‌सला पुणेरी झटका 

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑगस्ट 2019

पाटणा - प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात सलग तीन पराभव पत्कराव्या लागलेल्या पुणेरी पलटण संघाने रविवारी माजी विजेत्या पाटणा पायरेट्‌सला अस्सल पुणेरी झटका दाखवत 41-20 असा विजय मिळविला. या मोसमातील हा त्यांचा पहिला विजय ठरला, तर पाटणा संघाला घरच्या मैदानावर दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. 

पाटणा - प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात सलग तीन पराभव पत्कराव्या लागलेल्या पुणेरी पलटण संघाने रविवारी माजी विजेत्या पाटणा पायरेट्‌सला अस्सल पुणेरी झटका दाखवत 41-20 असा विजय मिळविला. या मोसमातील हा त्यांचा पहिला विजय ठरला, तर पाटणा संघाला घरच्या मैदानावर दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. 

पुणे संघाने आज राखलेला भक्कम बचावच त्यांच्या विजयाचे मुख्य आकर्षण ठरला. त्यांची सुरवातच इतकी भन्नाट राहिली की त्यांनी दहाव्या मिनिटाला 14-0 अशी मोठी आघाडी घेतली होती. सुरवातीच्या इतक्‍या मोठ्या पिछाडीनंतर पाटणाला सामन्यात परत येणे जमलेच नाही. अर्थात, यातही त्यांनी पूर्वार्धात पुणे संघावर लोण देत सामन्यात परतण्याची धडपड दाखवली होती. पण, त्यांच्या प्रदीप नरवालला सातत्याने आलेले अपयश त्यांचे खच्चीकरण करण्यास पुरेसे होते. पाटणाचा हाच कच्चा दुवा शोधून पुणे संघाने प्रदीपला सातत्याने लक्ष्य केले आणि तेच त्यांच्या पथ्यावर पडले. दोन्ही सत्रात एकेक लोण देत पुण्याने पाटणा संघाला सतत दडपणाखाली ठेवले. अमित कुमार, मंजीत आणि गिरीश इरनाक यांच्या खेळाने त्यांनी अगदीच एकतर्फी विजय साकार केला. विश्रांतीला 20-10 ही आघाडी पुण्याचे वर्चस्व सिद्ध करणारी ठरली. पुण्याकडून अमित कुमारने 9, तर राखीव खेळाडूम्हणून उतरलेल्या पंकज मोहितेने आठ गुणांची कमाई केली. पुण्याने पकडीमध्ये 17-7 असे निर्विवाद वर्चस्व राखले. चढाईमध्ये देखील पुणे 19-11 असे पुढे राहिले. 

तमिळ थलैवाजची बाजी 
त्यापूर्वी, झालेल्या पहिल्या सामन्यात राहुल चौधरीच्या तुफानी चढायांच्या जोरावर तमीळ थलैवाज संघाने विश्रांतीच्या 19-10 अशा पिछाडीनंतर हरियाना स्टिलर्सचे आव्हान 35-28 असे परतवून लावले. राहुलच्या चढायाच निर्णायक ठरल्या. त्याने 12 गुणांची कमाई केली. मनजित चिल्लर आणि अजय ठाकूरची त्याला साथ मिळाली. हरियानाकडून विकास कंडोला, विनय यांची झुंज तोडकी पडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Puneri Paltan first win of season