आर. श्रीधर होणार भारताचे 'फिल्डिंग कोच'

पीटीआय
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

बंगळूर

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक म्हणून आर. श्रीधर यांची नियुक्ती होण्याची दाट शक्‍यता आहे. सध्या श्रीधर हे भारतीय ‘अ‘ संघाच्या क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी ते संघात दाखल होतील. 

गेल्या एप्रिलमध्ये भारतात झालेली ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर श्रीधर यांचा भारतीय संघाबरोबर असलेला करार संपुष्टात आला होता. त्यानंतर पुन्हा त्यांचीच नियुक्ती करण्याविषयी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे विशेष आग्रही होते. 

वेस्ट इंडीजच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाला फलंदाजी आणि गोलंदाचे तात्पुरते प्रशिक्षक देण्यात आले होते. ‘इतर सर्व प्रशिक्षकपदासाठी पूर्ण वेळ नियुक्ती 15 सप्टेंबरनंतर केली जाईल,‘ असे ‘बीसीसीआय‘चे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते. फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून संजय बांगर यांची नियुक्ती कायम राहील. तसेच, न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपेपर्यंत गोलंदाजीच्या प्रशिक्षकाचा निर्णय होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: R Shridhar will become fielding coach of India