'काळा आला बघ' म्हणणारा पाक कर्णधार अडचणीत

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 जानेवारी 2019

मात्र, या सामन्यात पाकिस्तान कर्णधार सर्फराज अहमद याने दक्षिण आफ्रिकेच्या अँडिल फेहलुकवायोविरुद्ध केलेली वर्णभेदी टिप्पणीच चर्चेत आहे.

डर्बन : पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानच्या 203 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 5 बाद 207 धावा केल्या. मात्र, या सामन्यात पाकिस्तान कर्णधार सर्फराज अहमद याने दक्षिण आफ्रिकेच्या अँडिल फेहलुकवायोविरुद्ध केलेली वर्णभेदी टिप्पणीच चर्चेत आहे.

सर्फराजची ही कृती त्याला महाग पडू शकते. फेहलुकवायो याने दक्षिण आफ्रिकेच्या विजयात अष्टपैलू कामगिरी केली. त्याने चार गडी बाद केल्यावर 69 धावांची खेळी केली. फलंदाजी करत असताना यष्टिमागून सर्फराज फेहलुकवायो यास 'काळा आला बघ' असे म्हणत असल्याचे स्टम्पमधील माईक आणि कॅमेऱ्यामुळे स्पष्ट दिसत होते.

सर्फराजने त्यानंतर आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली, ''नैराश्यातून केलेल्या त्या वक्तव्याबद्दल मी मनापीसून माफी मागतो. माझाला कोणालाही दुखविण्याचा हेतू नव्हता. माझे ते शब्द कोणाही एकाला उद्देशून नव्हते,'' अशा शब्दांत त्याने माफी मागितली आहे. मात्र, त्यानंतरही आयसीसीकडून त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: racists comments might create problems for pak captain