
Ranji Trophy: उनाडकटच्या ‘षटकार’ने बंगालचे स्वप्न भंगले! सौराष्ट्राने जिंकले विजेतेपद
Ranji Trophy 2022-23 Saurashtra : रणजी ट्रॉफी 2022-23 चा अंतिम सामना सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात खेळल्या गेला. सौराष्ट्रने तब्बल ३ दशकांनंतर बंगालचे रणजी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. जयदेव उनाडकटच्या सौराष्ट्र संघाने अंतिम फेरीत बंगालचा 9 गडी राखून पराभव करत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
सौराष्ट्रच्या संघाने बंगालवर बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत पूर्णपणे वर्चस्व गाजवले. गोलंदाजांनी बंगालचा पहिला डाव 174 धावांत गुंडाळला. उनाडकट आणि चेतन साकारिया यांनी 3-3 विकेट घेतल्या, तर चिराग जानीला दोन मिळाल्या. यानंतर मैदानात उतरलेल्या सौराष्ट्राने हार्विक देसाई, शेल्डन जॅक्सन, अर्पित आणि चिराग जानी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आपल्या डावात 404 धावा केल्या. सौराष्ट्रने पहिल्या डावातच बंगालवर दडपण आणले. मनोज तिवारीचा संघही या दबावाखाली आला, त्याचा परिणाम त्याच्या दुसऱ्या डावात दिसून आला. बंगालचा संघ दुसऱ्या सामन्यात केवळ 241 धावा करू शकला.
मजुमदार आणि मनोज तिवारी या दोघांनीही अर्धशतके झळकावली, पण बाकीचे फलंदाज काही खास करू शकले नाही. उनाडकटने दुसऱ्या डावात 85 धावांत 6 विकेट घेतल्या. बंगाल पहिल्या डावात खूपच मागे पडला होता, जो त्यांना दुसऱ्या डावातही पूर्ण करता आला नाही आणि सौराष्ट्रासमोर फक्त 12 धावांचे लक्ष्य ठेवले, जे उनाडकटच्या संघाने एक विकेट गमावून पूर्ण केले.
उनाडकट चेंडूने कहर करत आहे. यासोबतच तो कर्णधारपदातही आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. तो सौराष्ट्राचा यशस्वी कर्णधार म्हणून उदयास आला. त्याच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्राने गेल्या वर्षी रणजी करंडक आणि विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती. 2019-2020 मध्येही सौराष्ट्राने बंगालचा पराभव करून प्रथमच रणजी करंडक जिंकला होता.