
Ranji Trophy : मुंबई संघाकडे फक्त ३९ धावांची आघाडी
मुंबई : मध्यमगती वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे व डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलानी यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीमुळे मुंबईने तमिळनाडूचा पहिला डाव १४४ धावांमध्ये संपुष्टात आणला; मात्र सर्वाधिक रणजी विजेत्या ठरलेल्या मुंबईच्या फलंदाजांना पहिल्या डावात चमक दाखवता आली नाही.
रणजी करंडकातील ब गटाच्या लढतीत पहिल्या दिवसअखेरीस मुंबईची अवस्था ६ बाद १८३ धावा अशी झाली आहे. त्यामुळे मुंबईचा संघ आता फक्त ३९ धावांनी आघाडीवर आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, पण तुषार देशपांडे व मोहित अवस्थी यांच्या गोलंदाजीपुढे तमिळनाडूच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही.
तमिळनाडूचा निम्मा संघ ७३ धावांमध्ये बाद झाला. त्यानंतर प्रदोश पॉल याने ९ चौकारांसह ५५ धावांची खेळी साकारली. त्यामुळे तमिळनाडूला १४४ धावांचा टप्पा ओलांडता आला. तुषारने ३७ धावा देत पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शम्स मुलानीने ३३ धावा देत तीन फलंदाज गारद केले.
संक्षिप्त धावफलक ः तमिळनाडू- पहिला डाव सर्व बाद १४४ धावा (प्रदोश पॉल ५५, तुषार देशपांडे ५/३७, शम्स मुलानी ३/३३) वि. मुंबई ६ बाद १८३ धावा (पृथ्वी शॉ ३५, अजिंक्य रहाणे ४२, सर्फराझ खान नाबाद ४६).
फलंदाज अपयशी
मुंबईच्या फलंदाजांना पहिल्या डावात अपयश आले. पृथ्वी शॉ (३५ धावा), यशस्वी जैसवाल (०), अरमान जाफर (४ धावा) यांच्याकडून निराशा झाली. कर्णधार अजिंक्य रहाणेने ४२ धावांची आश्वासक खेळी केली, पण त्याला या खेळीचे रूपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. अश्विन क्रीस्टने त्याला बाद केले.
हार्दिक तामोरे १० धावांवर; तर शम्स मुलानी २८ धावांवर बाद झाला. सर्फराझ खानने ६ चौकारांसह नाबाद ४६ धावांची खेळी केली असून त्याच्यासोबत तनुष कोटियन ९ धावांवर खेळत आहे. या दोघांच्या खांद्यावरच मुंबईच्या पहिल्या डावाची मदार असणार आहे.